आहुर्ली : प्रतिनिधी
हल्ली स्री ही केवळ उपभोगाची वस्तू मानली जाण्याचे व अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. समाजातील ही विक्रुती इतकी फोफावत चालली आहे कि यात चक्क नाते, वय ही पाहिले जात नाही तर आदीचांही यात बळी पडत आहे. असेच एक घ्रुणास्पद कृत्य त्रंबकेश्वर तालुक्यात घडले असून, चक्क मनोरुग्ण महिलेवर अज्ञात लोकांनी अत्याचार करत या महिलेस गर्भवती केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही या महिलेवर अत्याचार होऊन तिने मुलही जन्मास घातले होते. त्यानंतर दुसर्यांदा हा प्रकार घडला आहे. याबाबत श्रमजिवी संघटनेचे पदाधिकारी भगवान मधे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे समाज व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
याबाबत मधे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगाव, ता.त्रंबकेश्वर येथील एक महिला गेल्या कित्येक दिवसापासून वेडसर झालेली असून, निराधार अवस्थेत इकडे तिकडे भटकंती करत असते. या मनोरुग्ण महिलेकडे तिच्या कुटुंबानेही पाठ फिरवली असून, भिक मागून ही मनोरुग्ण महिला जगते आहे. या महिलेच्या वेडेपणाचा फायदा उठवत कुणीतरी अज्ञात एक वा अनेक व्यक्ती या महिलेचे शारिरीक शोषण करत आहेत. त्यातून ही महिला सध्या गर्भवती आहे. यापूर्वी ही सदर महिलेला गर्भधारणा झाली होती. अपत्य प्राप्तीही झाली होती. विशेष म्हणजे सदर महिला अपत्य सांभाळू शकत नाही हे लक्षात घेऊन एका जि.प.शिक्षकाने या अपत्यास दत्तक घेऊन मायेचे छत्र दिले आहे. दुसर्यांदा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली असून, या संतापजनक घटनेबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.