नाशिक : प्रतिनिधी
उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्या़साठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणार्या तालुका कृषी अधिकार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. अण्णासाहेब हेमंत गागरे (वय 42) असे या कृषी अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसी या ठिकाणी शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकर्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता कृषी अधिकार्यांनी तक्रारदार यांच्याकडे रू 4,00,000/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती रू 2,00,000/- लाच घेण्याचे निश्चित केले. त्यातील लाचेचा पहिला हफ्ता रू 50 हजार रुपये कृषी अधिकार्यांना स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.