नाशिकच्या औद्योगिक विश्वाला नव्या उंचीवर नेण्यासाठी निमाचे अध्यक्ष आणि उद्योग क्षेत्रातील एक दिग्गज धनंजय बेळे यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत.उद्योजकांच्या हितासाठी कोणतेही औद्योगिक प्रदर्शन घेऊन ते यशस्वी करून दाखवणे हे खरंतर जिकिरीचे काम असते.परंतु संघटन कौशल्य,कुशल नेतृत्व आणि कल्पकतेच्या जोरावर ते तडीस नेण्याची धमक कुणात असेल तर ती धनंजय बेळे यांच्यामध्ये असे म्हटले तर ते वावगं ठरणार नाही.त्यांना जीवाभावाच्या सहकाऱ्यांची मोलाची साथही लाभते आणि म्हणूनच ते निर्धास्त असतात ही गोष्ट विसरून चालणार नाही.बँक समिटच्या यशानंतर आता बेळेंच्या नेतृत्वाखाली 19 ते 22 मे दरम्यान निमा पॉवर एक्झिबिशन 2023चे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक हे इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक उद्योगांचे हब व्हावे येथे मोठे उद्योग यावेत रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याला देशभरातील या क्षेत्राशी निगडित असलेल्या विविध कंपन्या आणि उद्योजकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता हे प्रदर्शन म्हणजे उद्योजकांचा एकप्रकारे कुंभमेळाच भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही वर्षात नाशिकची औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे.नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)चा त्यात मोठा हातभार आहे.जिल्ह्यातील उद्योजकांचे नेतृत्व ही संघटना करते.गेल्या 52 वर्षांत नाशिकच नव्हे तर वेळप्रसंगी उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्रातील उद्योजकांना दिशा दाखविण्याचे काम निमाने केले आहे.आज जिल्ह्यात निमाचे 3500हून अधिक सभासद आणि जवळपास 16000 हून अधिक उद्योजक आहेत. जिल्ह्याच्या विकासात या सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. 2010 मध्ये धनंजय बेळे यांच्यासारख्या युवा नेतृत्वावर उद्योजकांनी विश्वास टाकला आणि त्यांच्याकडे निमाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविल्यानंतर निमाची जी भरभराट झाली त्याला निश्चितच तोड नाही. उद्योजकांचे प्रश्न धसास लावण्याची व दूरदृष्टीचेनिर्णय घेण्याची क्षमता, कल्पकता आणि उद्योजकांना एका छताखाली आणून त्यांची घट्ट वज्रमूठ बांधण्याचे काम करून बेळे यांनी निमावर चांगली पकड बसवली आणि या संस्थेला आगळ्या यशोशिखरावर नेऊन बसवले आहे.दर तीन वर्षांनी भरणारे निमा इंडेक्स प्रदर्शन तर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.काही वर्षांपूर्वी निमाने मुंबईत हे प्रदर्शन भरवून सर्वानाच चकित केले होते.याच बरोबरीने निमा एक्सलन्स अवॉर्ड, निमा स्टार्टअप हब आणि निमाचे नुकतेच झालेले बँक समिट,ज्यात सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खाजगी बँका तसेच काही वित्तीय संस्थांनी सहभाग नोंदवला. जवळपास 1000 उद्योजकांच्या कर्जप्रकरणांचा मार्ग त्याने मोकळा झाला.आता निमातर्फे महत्त्वाच्या इव्हेंटपैकी एक असलेले निमा पॉवर एक्झिबिशन 19 ते 22मे दरम्यान सातपूर येथे त्र्यंबकरोडवरील आयटीआयच्या भव्य मैदानावर संपन्न होत असून त्याची तयारी ज्या जोमाने सुरू आहे ते बघता बेळे यांनी नाशिकला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक हब करण्याचे जे स्वप्न उराशी बाळगले ते निश्चितच साकार होईल हे निश्चित.
2010 मध्ये बेळे यांनी निमाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर निमाने कात टाकली असे बोलले जाते आणि ती वस्तुस्थिती आहे.नाशकात व जिल्ह्यात मोठे प्रकल्प यावेत यासाठी त्यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले. महिंद्राचा विस्ताराच्या प्रकल्प नाशकात होऊ घातला होता.परंतु राजकीय अनास्था किंवा प्रशासकीय दिरंगाई म्हणा जागेअभावी हा प्रकल्प 2012मध्ये चाकणला गेला आणि त्यानंतरच चाकणचा ऑटोमोबाईल हब म्हणून विस्तार झाला.व नाशिक मात्र या क्षेत्रात पिछाडीवर राहिले.नाशिकची संधी हुकल्याने बेळे यामुळे खूप व्यथित झाले आणि तेव्हापासून त्यांनी नाशिकच्या उद्योग क्षेत्राचा मोठ्याप्रमाणात विस्तार करण्याचा तसेच आणि नवनवीन प्रकल्प येथे आणण्याचा जणू विडाच उचलला.2013मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असलेली नाशिकची ताकद दाखवून देण्यासाठी त्यांनी निमातर्फे पहिले आणि आगळेवेगळे निमो पॉवर प्रदर्शन आयोजित करून सर्वांना चकित केले.त्यानंतर 2016साली सुद्धा त्यांनी याच श्रृंखलेतील दुसरे प्रदर्शन आयोजित करून नाशिकसुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे दाखवून दिले.2013च्या प्रदर्शनाचे फलित म्हणजे नाशिकला सीपीआरएची टेस्टिंग लॅब मंजूर झाली आडगाव नजीकच्या शिलापूर येथे हे लॅब 100 एकरच्या जागेत साकारत आहे.पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प 100 कोटींचा असून नंतर 500 कोटीपर्यंत त्याचा विस्तार होणार आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा कहर आणि काही काळ निमावर घोंगावलेले वादळ यामुळे निमाच्या एक्टिव्हिटीज काही काळ थंडावल्या होत्या.परंतु निमावर धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता आल्यानंतर संस्थेने पुन्हा एकदा गरुडझेप घेण्यास प्रारंभ केला आहे.बँक समिटच्या याच्यानंतर आता पुन्हा एकदा पॉवर एक्झिबिशन 2023 आयोजित करण्याचा निर्धार करून तो तडीस नेण्याचा चंग बेळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधला आहे.नाशकात इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेशन,ऑटोमेशन आदी क्षेत्रात नाशिकची असलेली ताकद दाखवून देणे आणि नाशिक हे इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिकचे हब व्हावे हाच या मागचा खरा उद्देश आहे.केंद्राने नुकतेच महाराष्ट्रासाठी दोन इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजूर केले आहेत.पैकी एक पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे होणार असून दुसरे क्लस्टर नाशिकला व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.मुख्यमंत्री,उद्योगमंत्री,पालकमंत्री, विकास आयुक्त(उद्योग)यांनी त्याबाबत दाखवलेली सकारात्मकता तसेच नुकत्याच झालेल्या भूमिपूजन सोहळ्याच्यावेळी एमआयडीसीचे अधिकारी नितीन गवळी यांनी दिलेले संकेत लक्षात घेता नाशिककरांना लवकरच आनंदाची वार्ता मिळेल हे निश्चित.या क्लस्टरसाठी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे शंभर एकर जागा निश्चित झाली आहे हीं सुद्धा जमेची बाजू म्हणावी लागेल.नाशिक जिल्ह्यात सध्या 1260 इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक, आयओटी,आयटी,मॅक्रोनिक्स,इन्स्ट्रुमेंटेशन,ऑटोमेशन आदी क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योग आहेत.क्लस्टरची निर्मिती झाल्यास या उद्योगांमध्ये कमालीची वाढ होईल आणि रोजगार निर्मितीलाहीं त्याने अधिक चालना मिळेल. इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक उद्योगांमुळे प्रदूषण होत नाही आणि हीं गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.1000 एकर क्षेत्रात हे क्लस्टर व्हावे असा आग्रह निमाने धरला आहे.त्यामुळे जिल्ह्यात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर व दळणवळणाची सुविधा असलेल्या ठिकाणी त्यासाठी जागा उपलब्ध झाली तरी ते चालू शकेल. या क्लस्टरच्या माध्यमातून दोन एन्कर – मोठ्या इंडस्ट्रीज नाशकात येणार असल्याचे सुतोवाच एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे लघुउद्योगांना मोठ्याप्रमाणात काम मिळेल आणि कामगारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नाशकात इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक क्लस्टर झाल्यास पर्यायाने आयटी आणि आयओटी इंडस्ट्रीलाही त्यामुळे चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जातं आहे.
–मिलिंद राजपूत
अध्यक्ष,नीमा पॉवर प्रदर्शन