गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्जनशील शिक्षणातील योगदान

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्जनशील शिक्षणातील योगदान आणि 

शंभर वर्षाचे एच. पी. टी. कॉलेज

 

संस्थेची स्थापना

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन प्राचार्य त्र्यंबक आप्पाजी कुलकर्णी यांनी १९ फेब्रुवारी १९१८ रोजी गोखल्यांचे नाव धारण करणाऱ्या या संस्थेची स्थापना केली. बोर्डी या आदिवासी भागात पहिली शाळा तर लोकवर्गणीमधून १९२४ साली नाशिक येथे पहिले कॉलेज (एच. पी. टी. कॉलेज) स्थापन केले. आज १०४ वर्ष पूर्ण केलेल्या या संस्थेने विविध प्रकारच्या शिक्षण प्रवाहांची निर्मिती करून समाजामध्ये संजीवकता निर्माण केली आहे. सर डॉ. मो. स.  गोसावी व प्राचार्य एस. बी. पंडित यांच्या अर्धशतकी सर्जनशील नेतृत्वाखाली संस्थेने गुणात्मक आणि संख्यात्मक विकास घडवून महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाचे एक वेगळे पर्व सुरू केले. कला, वाणिज्य,विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, पॉलिटेक्निक तसेच कृषी या विविध स्तरावर केजी टू रिसर्च असे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम संस्था राबवित आहे. संस्था सध्या तीन विभाग (नाशिक मुंबई व पालघर), वीस केंद्रे आणि १४० शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि विशेष संस्था या माध्यमातून कार्यरत आहे. Above Self, Above Politics हे बोधवाक्य प्रमाण ठेवून निरपेक्ष आणि राजकारणविरहीत वातावरणात शिक्षणात काळनुरूप होणारे बदल अंगीकृत करत संस्था शतकपूर्तीनंतर पथदर्शक वाटचाल करीत आहे. 

संस्थेचे शैक्षणिक सामाजिक योगदान:

गोखले एज्युकेशन सोसायटीने शिक्षणातून समाजातील अनेक घटकांमध्ये संजीवकता निर्माण करण्याचे काम २० व्या शतकाच्या प्रारंभापासून केले. १९२० साली आशिया खंडातील पहिली कृषी शाळा बोर्डी येथे तर १९२४ मध्ये तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या बाहेर असणारे पहिले महाविद्यालय, एच. पी. टी. कॉलेजी स्थापना केली. शिक्षणाची गंगोत्री खऱ्या अर्थाने ग्रामीण, आदिवासी भागात पोहोचवून बहुजन समाजाच्या विकासाचे नवे पर्व सुरु केले. संस्था १९१८ पासून समाजातील निम्नस्तरातील (हरिजन) विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आली आहे. परळ-लालबाग भागातील गिरणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय म्हणून १९५५ मध्ये रात्र शाळा व त्यानंतर रात्र महाविद्यालय स्थापन केले. १९६८ मध्ये व्यवस्थापन शास्त्राचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करणारी भारतातील पहिली शिक्षण संस्था ठरण्याचा बहुमान ह्या संस्थेकडे जातो. नाशिक येथे १९६९ साली उत्तर महाराष्ट्रातील पहिले विधी महाविद्यालय, १९७५ साली कोसबाड येथे भारतातीलपहिले कृषी विज्ञान केंद्र तसेच १९८५ साली उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय, आजचे एस.एम.आर.के. महिला महाविद्यालय यांची स्थापना करून अनेक समाजघटकांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या.  संस्थेने बोर्डी, कोसबाड व जव्हार या आदिवासी बहुल भागात कुपोषण निर्मूलन तसेच आदिवासी कुटुंबांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी विविध प्रकारच्या संशोधनाद्वारे बहुमोल कार्य करून ‘शांतीपूर्ण क्रांती’ घडविली. संस्थेच्या शतकपूर्ती कालखंडात नर्सिंग कॉलेज, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, हेल्थ केअर मॅनेजमेंट या क्षेत्रात २० हून अधिक नवीन संस्था उभ्या केल्या. पारंपारिक शिक्षणाला व्यावसायिकता आणि उद्योजकता यांची जोड दिली. 

 

संस्थेची वैशिष्ट्ये:

गोखले एज्युकेशन सोसायटीने सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे स्थापनेपासून आजपर्यत या संस्थेचे व्यवस्थापन व संचालन आजीवन सदस्य असलेल्या शिक्षकांमार्फत पूर्णपणे केले जाते. डॉ. मो. स. गोसावी यांनी संस्थेचे सचिवपद सलग ५० वर्ष (१९७३-२०२३) भूषवून एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. कुठल्याही मतभेदाशिवाय आणि राजकारण विरहीत वातावरणात शिक्षण संस्था चालविली जाऊ शकते याचा अतिशय दुर्मिळ पण अनुकरणीय वस्तुपाठ डॉ. गोसावी सरांनी समाजासमोर प्रस्तुत केला. संस्थेतर्फे स्टाफ ट्रेनिंग ॲकॅडमी, रिसर्च अकॅडमी, सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क, स्पोर्ट्स अकॅडमी तसेच स्कॉलर्स क्लब यांची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेतर्फे १०० दर्जेदार पुस्तकांचे तसेच ७५ मासिकांचे प्रकाशन आजपर्यत करण्यात आले आहे. ‘स्वयंप्रकाश’ या संशोधन त्रैमासिकाचे २००८ पासून नियमित प्रकाशन केले जाते. संस्थेतर्फे दरवर्षी सर्वोत्कृष्ट शिक्षक, सर्वोत्कृष्ट कर्मचारी, सर्वोत्कृष्ट मासिक, शिक्षक-उद्योजक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संस्था आणि प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी फाइव्ह स्टार अवॉर्ड हे पुरस्कार देऊन पुढील कार्यास प्रेरणा दिली जाते. संस्थेच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी I-GAIN स्पर्धेचे आंतरविभागीय स्तरावर आयोजन केले जाते.संस्थेच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यसाठी १९६४ सालापासून क्रेडीट को-ऑपंरेटीव्ह सोसायटीची स्थापना. को-ऑपंरेटीव्ह सोसायटी पूर्णपणे कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जाते.

संस्था येणाऱ्या काळात वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्यसेवा व्यवस्थापन प्रकल्प उभा करीत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात गुरुदक्षिणा प्रकल्प आणि रुग्णालय सेवा सुरु झाल्या आहेत. ६०० बेड्सचे हॉस्पिटल, अत्यानुधिक लँब, वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र या सर्व गोष्टी येत्या तीन वर्षात आकारास येणार आहे. या प्रकल्पामुळे नासिकच्या नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या सर्व नाविन्यपूर्ण योजनांची परीपूर्ती करण्यासाठी संस्थेला नवनिर्वाचित सचिव व मानवसंसाधन संचालिका प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या रूपाने गतिशील आणि कृतीप्रवण नेतृत्व लाभलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि आजीव सदस्य हे मा. सर. डॉ. गोसावी यांनी पाहिलेले गोखले विद्यापीठाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

 

एच्. पी. टी. महाविद्यालयाची शतकपूर्ती: 

गोखले एज्युकेशन सोसायटीसाठी आनंद आणि अभिमानाची बाब म्हणजे एच्. पी. टी. आर्ट्स् अँड आर्. वाय्. के. सायन्स महाविद्यालय अर्थात् हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय आता शंभर वर्षांचे होत आहे. पुण्यमयी या नासिक नगरीतील वेदघोषाबरोबर आधुनिक शिक्षणाचे सूर मिसळविण्याचे कार्य प्राचार्य त्र्यंबक आप्पाजी कुलकर्णा यांनी, मुंबई सारखी अनेक संधी देणारी नगरी सोडून, ह्या लहानशा नासिक नगरीत येऊन केले. ते वर्ष होते १९२४. ‘वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा’, ह्या संस्कृत उक्तीला मागे टाकील असे महादानी आणि दूरदृष्टी असणारे मा. हंसराज प्रागजी ठाकरसी ह्यांनी नासिकला प्राचार्य कुलकर्णींना सर्वतोपरी मदत केली आणि त्या जागी सुरू झाले, एच्. पी. टी. महाविद्यालय रूपी ज्ञानतीर्थ!

मूळतः कलाशाखेचे असणारे हे महाविद्यालय; पण आज विविध विद्याशाख्यांच्या एकत्रित संशोधनाविषयी विचार करणारे आपण हे जाणून, आश्चर्यचकित होऊ की त्या काळी संस्कृत, मराठी, अर्धमागधी, ऊर्दू, पर्शिअन, गुजराती अशा भाषांचे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र असणारे हे महाविद्यालय, शेतीचे प्रयोग करत होते. बुद्धीला तेज यावे यासाठी जसे शिक्षण तसे शिक्षणाच्या प्रयोगशीलतेचे सामर्थ्य आपल्या अंगी यावे म्हणून, शारीरिक पुष्टीसाठी कुस्तीचा आखाडाही इथे चालत असे. बास्केटबॉल, ऍथलेटिक्स, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, टेनिस, नेमबाजी अशा विविध खेळांसाठी, आजही महाविद्यालयात खेळाचा विभाग असून, विविध विद्यार्थी त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यश प्राप्त करत आहेत.

१९२४ च्या काळातील नासिकपासून काहीसा दूर असणारा हा महाविद्यालयाचा परिसर, निसर्गाचा मानवाशी असणारा संवाद विचारात घेऊन, विविध वृक्षांचे रोपण, नौका विहारासाठी तलाव इ. विविध गोष्टींनी, अतिशय आल्हाददायी बनला होता. १९४० मधे भाषांच्या विभागांबरोबरच तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र अशा सामाजिक शास्त्रांचे अध्ययन या महाविद्यालयात सुरू झाले. पुढे विज्ञान विषयाचेही अध्ययन या महाविद्यालयाच्या आवारात सुरू झाले. विज्ञानाच्या अध्ययनाच्या दृष्टीने सुसज्ज प्रयोगशाळा याठिकाणी उभारल्या गेल्या. पवित्र हेतु जिथे असतो तिथे दैवी शक्ती पाठिशी उभी राहते, असे आपण म्हणतो. तीच गोष्ट इथेही घडलेली आहे. श्री. रावजीसा यमासा क्षत्रिय यांनी ह्या विज्ञान महाविद्यालयास आकार घेण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आणि एच्. पी. टी. महाविद्यालय हे, एच्. पी. टी. आर्ट्स् अँड आर्. वाय्. के. सायन्स म्हणून महाराष्ट्रात नावारूपास आले. पदवी विभागांबरोबर पुढे पदव्युत्तर विभागही सुरू झाले. १९७६ साली कनिष्ठ महाविद्यालयास प्रारंभ झाला. हेच आजचे आर्. एच्. सपट ज्युनिअर महाविद्यालय होय.

आरंभी ९७ विद्यार्थी, ६ प्राध्यापक, आणि ६ प्राध्यापकेतर सहाय्यक वृंद अशा व्यक्तींशी जोडले गेलेले हे महाविद्यालय विस्तारत गेले. आज ४००० हून अधिक विद्यार्थ्यी, १०७ प्राध्यापक आणि ९० हून अधिक प्राध्यापकेतर सहाय्यक वृंदांना आपल्यामधे सामावून घेणारे आहे. विद्यार्थ्यांना घडवणारे हे महाविद्यालय, एक लाखांहून अधिक पुस्तकांनी, दुर्मिळ अशा हस्तलिखित संग्रहाने सुसज्ज अशा ग्रंथालयाने युक्त आहे. महाविद्यालयाची प्रगती लक्षात घेऊन, विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास अनुदान दिले. काळाची पाऊले ओळखून, दूरशिक्षणाची सोय, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग, वृत्तपत्र विद्या पदवी अभ्यासक्रम, इलेक्ट्रॉनिक्स, संगण अशा अभ्यासक्रमास प्रारंभ ऐंशीच्या दशकात झाला. विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची सुरुवात महाविद्यालयात केली गेली. पदव्युत्तर विभागांबरोबरच तेरा संशोधनाचे विभाग महाविद्यालयात सध्या सुरू आहेत आणि शेकडो विद्यार्थी या ठिकाणी संशोधन करत आहेत.

महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज समाजामधे विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण रितीने कार्य करत आहेत. कवी कुसुमाग्रज, सौंदर्यशास्त्र समीक्षक डॉ रा. भ. पाटणकर, समीक्षक डॉ. वा. ल. कुलकर्णी, डॉ. गो.के.भट या कवी, नाटककारांबरोबरच डॉ. सुहास पळशीकरांसारखे राज्यशास्त्रतज्ज्ञ, अनेक संशोधक-वैज्ञानिक या महाविद्यालयाने निर्माण केले आहेत, नव्हे आजही हा वारसा चालू आहे, जसे श्री. आनंद लिमये, श्री काळे (बोईंग, भारत देशातील प्रमुख), डॉ विवेक सावंत, डॉ. अश्विनी देव हे असे महाविद्यालयाचे विद्यार्थीनी आजही संशोधनादि माध्यमांतून समाजामधे योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रा. वसंत कानेटकर, डॉ. गो. वि. देवस्थळी, प्रा. आंबेकर, प्रा. गोविलकर, प्रा. बाबासाहेब दातार, प्राचार्य एन. एम. आचार्य, प्रा. ताकाखाव असे अनेक उत्तमोत्तम प्राध्यापक या महाविद्यालयाने दिले आणि तो वारसा आजही महाविद्यालयात अद्ययावतपणे जपला जातो आहे.

चांगला नागरिक घडविणे, हे आपले कर्तव्य मानणा-या महाविद्याचे हे विद्यार्थी आणि प्राध्यापक महाविद्यालयाचे नांव निश्चितच उंचावत आहेत आणि त्यांचा महाविद्यालयास अभिमान वाटतो. गोखले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य एस्. बी. पंडित आणि माजी सचिव आणि महासंचालक, मा. सर डॉ. मो. स. गोसावी या दोघांनीही एच्. पी. टी. महाविद्यालयावर पुत्रवत् स्नेह केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय असलेल्या एच्. पी. टी. महाविद्यालयाच्या विकासासाठी ह्या दोन्ही ज्येष्ठ, पितृतुल्य गुरूजनांचे नेहमीच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालेले आहे. महाविद्यालयाच्या पहिल्या प्राचार्यांपासून म्हणजे मा. त्र्यंबक आप्पाजी कुलकर्णी यांच्यापासून, प्राचार्य भा. ल. पाटणकर, प्राचार्य गजेंद्रगडकर, प्राचार्य एस्. जी. पुराणिक, प्राचार्य एन्. एम्. आचार्य, प्राचार्य व्ही. जी. ओक, प्राचार्य बी. बी. चौरे, प्राचार्य भा. व्यं. गिरधारी, प्राचार्य व्ही. एन्. सूर्यवंशी, आणि सध्याच्या प्राचार्य डॉ. सौ. एम्. डी. देशपांडे, ह्या सर्वांनी विद्यार्थी हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध चर्चासत्रे, व्याख्याने, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विविध ठिकाणी जाऊन, समाजाशी त्यांना जोडणे, बायोगॅस प्रकल्प, फिरती प्रयोगशाळा यांसारख्या उपक्रमांतून त्यांच्यातील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देणे. त्यांच्यातील कलात्मकता वाढविणे, असे नैकविध कार्यक्रम महाविद्यालयाच्या आवारात होत असतात. 

महाविद्यालयाने नासिककरांशी पण आपले भावनिक आणि सांस्कृतिक नाते जोपासण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही तो प्रयत्न सुरू आहे. नासिककरांसाठी व्याख्यानांचे आयोदन, प्रदर्शनांचे आयोजन, विविध शाळा आणि महाविद्यालयातील अध्यापकांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, व्याख्याने यांचे आयोजन महाविद्यालयातर्फे आजही केले जात आहे. काळानुरूप स्वतःत परिवर्तन करण्याची मानसिकता असणारे हे महाविद्यालय, संशोधन आणि अध्ययनातील नवनवीन क्षितीजांना फार पूर्वीपासून गवसणी घालणारे आहे. आताही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदलणा-या अभ्यासाच्या दिशेकडे अतिशय सकारात्मक रितीने महाविद्यालय पहात असून, त्यासाठीची पूर्वतयारी करत आहे. ह्या शंभरीच्या उंबरठ्यावर असताना आत्मपरीक्षण करणा-या या महाविद्यालयाच्या, एका गोष्टीत मात्र परिवर्तन झाले नाही, ते म्हणजे, विद्यार्थ्यांच्या हिताची जोपासणी, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाची दृष्टी विकसित करण्याची आस आणि ‘हंसक्षीरन्यायाने’ जे-जे उत्तम आहे, ते-ते ग्रहण करण्याचा ध्यास…

-डॉ. लीना हुन्नरगीकर

(लेखिका एच्. पी. टी. आर्ट्स् अँड आर्. वाय्. के. सायन्स कॉलेजमध्ये संस्कृत विभागाच्या प्रमुख आहेत.)

One thought on “गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्जनशील शिक्षणातील योगदान

  1. अप्रतिम लेख,
    Remarkable with nice contents. Very informative article.
    शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *