कल्याणमध्ये ‘लोको पायलट’ची आत्महत्या
शहापूर: प्रतिनिधीडोंबिवली – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या सुजित कुमार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुजित यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कर्मचारी बोलत आहेत.
सुजित कुमार हे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रहाण्यास होते. ते मुंबई रेल्वेत लोको पायलट म्हणून काम करत होते. सुजितने प्रशिक्षण पूर्ण केले होते, त्यात तो पासही झाला होता. पण नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला ड्युटीवर घेतलेच नाही. तब्बल तीन महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आले होते.
सुजित कुमार याला सप्टेंबर महिन्यापर्यंत निलंबित केले गेलं आहे. आर्थिक परिस्थिती खराब झाल्यावर त्याने असे पाऊल उचलले असावे असे लोको पायलट म्हणून कार्यरत असलेल्या हरिश चिंचोले यांनी सांगितले. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी याच कारणामुळे सुजित याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळवणूक सुरु असल्याचा आरोप देखील केला आहे. सुजित कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला आहे. यावेळी रुग्णालय परिसरत तसेच रेल्वे मोटरमन कार्यालयाच्या बाहेर रेल्वे कर्मचारी गोंधळ घातला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कारवाई होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे पोलिस व आरपीएफ जवानांनी जमावास पांगवले. यानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.