ड्रग्ज तस्कर ललित पाटील अखेर जेरबंद – चेन्नईत मुंबई पोलिसांची कारवाई

ड्रग्ज तस्कर ललित पाटील अखेर जेरबंद

– चेन्नईत मुंबई पोलिसांची कारवाई

नाशिक – विशेष प्रतिनिधी
आजारपणाच्या नावाखाली पुण्याच्या ससून रुग्णालयात मुक्काम ठोकणारा….तेथूनच ‘एमडी’ सारख्या घातक ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या व पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला बहुचर्चित ललित पाटील (पानपाटील) अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. त्याला चेन्नईमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ससून हॉस्पिटलमधून २ ऑक्टोबरला रात्री पोलीस बंदोबस्तातून ससूनमधून ललित पाटील पसार झाल्यानंतर पुणे, नाशिक, मुंबई या राज्यातील ‘गोल्डन ट्रॅंगल’ मधील एमडी ड्रग्ज या घातक व महागड्या नशेचा बाजार चव्हाट्यावर आला होता. यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून तब्बल २६७ कोटींचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले तर त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी दुसऱ्या गोदामावर छापा टाकून सहा कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.
पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व साथीदार अभिषेक बलकवडे यांना ताब्यात घेतले. मात्र ललित पाटील फरारच होता. अखेर पंधरवड्यानंतर तो चेन्नई येथे मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र या कारवाईबाबतची सविस्तर माहिती समोर यायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *