महात्मा गांधी रोडवरील कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

महात्मा गांधी रोडवरील कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

– फटाक्यांमुळे घडली दुर्घटना

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात लक्ष्मी पूजनाची धूम ओसरत असतानाच रात्री ११.४५ वाजता महात्मा गांधी रोडवरील मुंदडा मार्केट लगत असलेल्या वर्धमान कलेक्शन या तीन मजली दुकानाला आग लागल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांची हानी झाली असून १२ तासानंतरही आग धुमसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दल कार्यरत आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

शहरात रविवारी लक्ष्मी पूजन उत्साहात साजरे झाले. सायंकाळनंतर शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत आतषबाजी सुरू असताना आगीची घटना समोर आली. मुंदडा मार्केट जवळ असलेल्या वर्धमान कलेक्शन या कपड्याच्या तीन मजली दुकानाच्या वरच्या मजल्यावरून धूर येऊ लागल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला वर्दी दिली. दिपावलीनिमित्त कपड्यांचा मोठ्या प्रमाणात माल असल्याने आग झपाट्याने पसरली. तिसरा व दुसरा मजला आगीमुळे वेढला गेला होता. आगीचे स्वरूप लक्षात घेऊन अग्निशामक दलाच्या मुख्यालयासह सातपूर, सिडको, पंचवटी या केंद्रावरून बंब मागवण्यात आले. नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त नितिन नेर, स्वीय सचिव दिलीप काठे आदी अधिकारी तसेच चीफ फायर ऑफिसर संजय बैरागी, के.टी. पाटील, आर सी मोरे, पी. बी. परदेशी यांच्यासह लासूरे, सोमनाथ थोरात, व्ही.पी. शिंदे, खोडे, पवार, राजू नाकील, सांत्रस, देटके, अभिजीत देशमुख, ठाकरे, रूपवते
आदींनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत आग पूर्णतः विझलेली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *