लासलगाव:समीर पठाण
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी व कांद्याची निर्यात बंदी तातडीने उठवण्यात यावी या मागणीसाठी कातरणी येथील शेतकरी गोरख वाल्मीक संत यांनी लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवार प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आज सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जो पर्यंत कांद्याची निर्यात बंदी उठवली जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असून”केंद्राचे धोरण म्हणजे शेतक-यांचे मरण होय.” अशी प्रखर टीका उपोषणकर्ते गोरख वाल्मीक संत यांनी या वेळी व्यक्त केली
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.सदरचा आदेश ज्या दिवशी देण्यात आला त्याच दिवशी लागु करण्यात आला त्यामुळे शेतक-यांचे कांदयाचे बाजारभाव पाडण्यात आले आहे व त्यामुळे शेतक-यांचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे त्यास केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार आहे.केंद्र सरकारने अथवा राज्य सरकारने नविन कांदा पिक बाजारात आल्यानंतर आणि नविन कांदा साठवणुक करता येत नसतांनाही कांदयाचे बाजारभाव पाडण्यासाठी निर्यात बंदी केली असल्याचा आरोप संत यांनी केला आहे
केंद्र सरकारने यापुर्वीही कांदा निर्यातीवर ४०% निर्यात शुल्क (एक्सपोर्ट ड्युटी)लावुन एकप्रकारे निर्यातबंदी केलेली होती.त्यामुळे शेतक-यांचे बाजारभाव पाडुन नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान केंद्र सरकारने केले आहे.केंद्र सरकार जो पावेतो निर्यात बंदीचा निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सदर उपोषण सुरूच राहणार असून या उपोषणामुळे कायदा सुवस्थेचा धोका निर्माण झाल्यास अगर माझे जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्यास शासकिय यंत्रणा व केंद्र सरकार जबाबदार राहिल असे उपोषण कर्ते गोरख संत यांनी या वेळी सांगितले.
या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम,बाळासाहेब दराडे यांच्यासह राहुल शेजवळ,बापू धरम,आनंदराव गीते,सागर आहेर विलास जगताप,अमित मुदगुल,पंडित मुदगुल,अभिजित डुकरे,संतोष घुगे,संदीप गोमाशे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.