विंचूर येथील एसबीआयचे एटीएम फोडून लाखो रुपयांची
चोरी
लासलगाव प्रतिनिधी
विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन पेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरने फोडून त्यातील लाखोंची रक्कम चोरून नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे
या धाडसी चोरी नंतर काही तासातच धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथेही अशी घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे याच टोळीने तेथेही हात मारला असावा असा अंदाज आहे.
गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले.एटीएम मधील छेडखानी नंतर लासलगाव पोलीस कार्यालयास संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे
व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत चोरटे फरार झाले.या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज नाही.तरी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे 33 लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती अशी अनधिकृत माहिती हाती येत आहे.
या घटनेची माहिती समजतात लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे,हवालदार सुजय बारगळ,हवालदार घुमरे हवालदार निचळ,हवालदार निकम,हवालदार डोंगरे,चालक देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली.कारच्या दिशेने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला.निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.आज सकाळी ठसे तज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक हे फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते.याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.