मुलगी शिकली… पण वाचली नाही!

डॉ. संजय धुर्जड*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
भाग – १
कल्पना करा… तुमची २२ – २४ वर्षांची मुलगी. खूप शिकली. शिकून डॉक्टर झाली. तुमचे स्वप्न पूर्ण झाले.  तुमच्या कष्टाचे चीज झाले. तुम्हाला तिचा खूप अभिमान, मुलगी आता डॉक्टर झाली, समाजाची सेवा करणार, दोन पैसे कमावणार, स्वावलंबी होणार, चांगले स्थळ बघून एकदा का लग्न झाले की तुमचे जीवन सार्थकी लागले, अशा विचाराने तुम्ही खूप आनंदी आहात. नेहमीप्रमाणे तुम्ही तिला रोज कॉल करताय, तिच्याशी बोलताय, तिची खुशालीची माहिती घेताय. ती आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात सेवा देत आहे, आणि पुढील काही दिवसात स्पेशालिस्ट, म्हणजे स्त्रीरोग तज्ञ म्हणून आपला व्यावसायिक प्रवासाला सुरवातही करणार आहे. याच आनंदाच्या दिवसांत तुम्हाला तिचा कॉल येतो, नेहमीप्रमाणे रात्री १० -११ च्या सुमारास तुम्ही तिच्याशी बोललात आणि गुड नाईटच्या शुभेच्छा देऊन तुम्ही झोपला. पहाटे तुम्हाला तिच्या कामाच्या ठिकाणाहून कॉल येतो. “तुमची मुलगी खूप सिरीयस आहे, तिला खूप मार लागलेला आहे, तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या”, असे कळविले. हे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकलाच, हो ना? तरी तुम्ही स्वतःला सावरत तुमच्या पत्नीला उठवले, तिला सोबत घेऊन, आहे त्या कपड्यानिशी तुम्ही मुलीच्या हॉस्पिटलला पोहोचलात. आधी तर तुम्हाला कुणी फारशी काही माहिती दिलीच नाही, फक्त सिरीयस आहे, इतकंच सांगीतले. तुम्ही तिला बघण्याची विनंती करताय, पण कुणी भेटू देत नाही. तुम्ही आरडाओरडा करताय पण त्याचा काही उपयोग होत नाही. खूप वेळाने तुम्हाला तेथील एका डॉक्टरने कळविले की तुमची मुलगी तुम्हाला सोडून गेली आहे. तिची प्राणज्योत माळवली आहे. तुम्हाला काय करावं सुचत नाही, कारण तुमचा त्यावर विश्वासच बसत नाहीए. काही तासांपूर्वी जिच्याशी मी बोललो, जी खुश होती, आनंदी होती, आपल्या कामात व्यस्त होती, ती अशी कशी अचानक सोडून जाऊ शकते, हे तुमच्यासाठी अविश्वासनियच असते. दुःख करू शकत नाही, रडूही येत नाही. जोवर, मी माझ्या डोळ्यांनी तिला बघत नाही, तोवर मी यावर विश्वास ठेवणार नाही, असाच विचार तुमच्या डोक्यात सुरू आहे. तुम्ही तिला बघण्याचा आग्रह करता, तेव्हा कुठे तुम्हाला तिला बघायला घेऊन जातात.
बघतो तर काय… तुमच्या मुलीला एका बेडशीट मध्ये गुंडाळलेले, चेहरा झाकलेला, अंगावरील आणि बेडवरील बेडशीट रक्ताने माखलेल्या, सलाईन सुरू आहे, व्हेंटिलेटर लावलेले, परंतु कोपऱ्यातील मॉनिटर शांत होता. काहीच आवाज नाही, कुठला आलेख नाही, की त्यावर कुठले आकडे दिसेनात. तुमच्या लक्षात आले, तुमची लाडकी तर खरंच तुम्हाला सोडून गेलीए. तुमचे तर अवसानच गळून गेले, तरी स्वतःला आणि पत्नीला सावरत, हिम्मत करून तुम्ही थोडे जवळ गेलात. डाव्या हाताने चेहऱ्यावरील चादर दूर करून बघताच, तुमचे डोळेच फाटले. तुमच्या चिमुकलीच्या निरागस डोळ्यात तिच्याच चष्म्याची काच घुसलेली, डावा डोळा फुटलेला, उजवा डोळा सुजलेला. चाहऱ्यावर असंख्य ओरखडे, गालावर आणि गळ्यावर चावल्याच्या खुणा, कापलेल्या जखमांमधून वाहिलेल्या रक्ताने पुसलेला चेहरा. केस विस्कटलेले, ओरबडलेले, कान फाटलेले. नुकत्याची झालेल्या तिच्या वाढदिवसाला तुम्ही तिला गिफ्ट दिलेले, ओरबाडून अर्धवट तुटलेले कर्णफुल बघून तुमच्या डोळ्यातून एक थेंब अश्रू तिच्या अंगावर पडला. चेहरा बघून पुढे काही बघण्याची हिम्मतच होईना. अंगाचा थरकाप होऊ लागला, पायात मरगळ आली, डोळ्यासमोर अंधारी येऊ लागतात तुम्ही थोडे सावध होऊन शेजारीच असलेल्या स्टुलावर बसले. डाव्या हाताने खाटाला धरले, उजव्या हाताला बायकोने धरून आधार दिला. तितक्यात ड्युटी डॉक्टर जवळ आले, आणि बाकीची माहिती देऊ लागले. त्यांचा आवाज अस्पष्टच ऐकू येत होता, परंतु जे काही समजले त्यावरून असे कळले की, तिच्या कंठाचे हाड फ्रॅक्चर झालेले आहे. जांघेचे आणि मांडीचे हाडे देखील फ्रॅक्चर होऊन दोन्ही खुबे काटकोनात मोडलेले आहे. अंगावर असंख्य जखमा झाल्या आहे आणि गुप्तांगाला प्रचंड सूज आहे. डॉक्टरांचा आवाज हळू हळू क्षीण होत गेला, मात्र डोळ्यांवरचा अंधार मात्र वाढत होता. पुढील काही क्षणांतच सगळे काही बंद पडले.
ही कुठली काल्पनिक कथा नसून, सत्य घटना आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालायतील एका महिला वैद्यकीय अधिकारीवर झालेल्या अमानुष अत्याचार झाला आहे. तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाची तीव्रता आणि भयानकता लक्षात यावी यासाठी तिच्या बापाच्या ठिकणी राहून कल्पना केली तर तुम्हालाही कळेल की तिच्यावर झालेल्या दुर्दैवी घटना किती भयंकर असेल, आणि तिच्या बापासाठी ती घटना किती क्लेशदायक असेल. देव करो की दुश्मनाच्या मुलीवर सुद्धा अशी वेळ कधी येऊ नये. ही तर अनेक घटनांपैकी एक घटना तुम्हाला सांगितली, आपल्या देशात रोजच अशा घटना घडताय. यात काही आश्चर्य वाटण्यासारखे असे काहीच नाही. उद्या तुमच्या मुलीच्या बाबतीतही असे काही घडले तर नवल वाटून घेऊ नका. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर भारताने याबाबतीतही प्रगती केली आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत राहणार. तुम्ही आणि मी असेच हातावर हात धरून बसून राहूया. जे घडतेय ते मजबुरीने बघत राहू, सहन करत राहू, अन्यायाला सामोरे जात राहू. हो की नाही? आता तुम्ही म्हणाल की मी एकटा काय करू शकतो. माझ्या हातात काय आहे? आणि सर्वात महत्वाचे की माझ्या बाबतीत काहीही झालेले नाही, तर मी कशाला या घटनेची दखल घेऊ, आंदोलन करू किव्हा संघर्ष करू?
परंतु, असा विचार त्या मुलीच्या डॉक्टर सहकाऱ्यांनी नाही केला. त्यांनी तिला न्याय मिळावा म्हणून, स्वातंत्र्य दिनाच्या  पूर्वसंध्येला मध्यरात्री एक मूक धरणे आंदोलन केले. या उद्देशाने की, किमान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तरी तिच्यावरील अन्यान आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध लक्ष वेधले जाईल. त्या नराधमांवर कारवाई होऊन तिला न्याय मिळेल. शेकडो डॉक्टर्स एके ठिकाणी जमून आपले प्रदर्शन करत असतांना, त्यांच्याकडे वेगळ्याच लोकांचे लक्ष वेधले गेले. तीन ते चार हजार लोकांचा एक झुंड त्यांच्यावर तुटून पडला. त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या हजारोंच्या संख्येने आलेल्या गुंडांना बघून बिचारे डॉक्टर्स आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करत मिळेल त्या ठिकाणी जाऊन लपून बसले. अक्षरशः टॉयलेट, बाथरूम, अंधारलेल्या खोल्या, टेरेसवर जाऊन जीव मुठीत धरून आपली रक्षा करावी म्हणून कॉल करून संरक्षणाची भीक मागत होते. हल्लखोरांनी मारझोड तर केलीच, त्याचसोबत स्टेज तोडला, मालमत्तेची तोडफोड केली, आरडाओरडा, घोषणाबाजी, धमक्या आणि विशेष म्हणजे त्या मुलीवर जिथे अतिप्रसंग झाला त्या जागेवर जाऊन तेथील पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.
तेथील सुरक्षा कर्मचारी हा सर्व तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत होते. बंदोबस्तासाठी असलेल्या तुटपुंज्या पोलीस कर्मचाऱ्यांचीही तीच अवस्था होती. सोशल मीडियावर या घटनेचे थरारक व्हीडिओ बघितल्यावर याची दहाकता लक्षात येते. नवल याचे वाटते की इतक्या रात्री, इतक्या मोठ्या प्रमाणात असे गुंड प्रवृत्तीचे लोक एकत्र कसे जमा झाले? कुणी जमा केले? कशासाठी जमा केले? शांततेत सुरू असलेले प्रदर्शन चिरडण्याची काय गरज होती? असे काही करण्याची कुणाला गरज वाटली? इतका मोठा हल्ला होणार असल्याची किव्हा झाल्याची बातमी पोलिसांना कशी नाही मिळाली? मिळाली असेल तर पोलीस घटनास्थळी पोलीस का नाही पोहोचू शकले? पोहोचल्यानंतर पोलिसांना किती लोकांना अटक केली? एका मुलीवर झालेल्या अन्यायाचा निषेध मोर्चाची हल्ली लोकांना भीती वाटू लागली आहे का? विशेष म्हणजे, मोर्च्यात सामील असलेले लोक डॉक्टर होते, तर त्यांच्यापासून तेथील समाजाला कोणता धोका जाणवला? स्वतंत्र भारतात आजही महिलांवरील अत्याचाराला समाज, शासन, प्रशासन, पोलीस, चौकशी यंत्रणा, घटनात्मक आयोग, विविध संघटना, राजकीय नेते आणि पक्ष आणि एकूणच भारतीय जनता इतकी असंवेदनशील झाली आहे का? हल्ल्यात झालेल्या जानमालाच्या नुकसानीला कोण जबाबदार असणार आहे? या घटनेत कुणाला शिक्षा होणार आहे की नेहमीप्रमाणेच वर्षानुवर्षे कोर्टबाजी सुरू राहणार आहे? ज्या डॉक्टर वर्गाला देवासमान आणि डॉक्टरी पेशाला सात्विक मानले जाते, त्याबाबत समाजात हाच काय तो मान, सन्मान आणि आदर उरला आहे का? समाजाची अशी मानसिकता का झाली आहे आणि या मानसिकतेचा महिलांच्या सुरक्षिततेवर तसेच डॉक्टर-रुग्ण संबंधांवर काय परिणाम होतील, याचा विचार व्हायला हवा! त्यासाठी या सर्व प्रकारात नेमकं काय घडले, का घडले, यामागे कोण आहे हे समजून घेऊया. वरील सर्व प्रश्नांवर सखोल विचार करून त्याचे सविस्तर विवेचन करूया! पुढील भागात!!! (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *