स्पर्धेमागे धावताना…
” स्पर्धा परीक्षेकडे करीयर म्हणून बघावे
आयुष्य म्हणून नव्हे…”
हे त्याने योग्य वेळीच ओळखले आणि ….
स्पर्धा परीक्षासाठी जीवाचा आटापिटा करुन दहा बारा तास होईपर्यत लायब्ररीची खुर्ची न सोडणारा गौरवने आज वास्तव स्विकारून या परीक्षांच्या धावाधावीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता…आणि हा निर्णय घेण्याचे धाडस करताना अभ्यासापेक्षाही मोठं धाडस वाटत होते…
निर्णय घेणं त्याच्यासाठी खूप अवघड होतं…पण धावण्यालाही एक मर्यादा असते…कुठे थांबायचं हे समजणेही बुद्धीमत्तेचीच कसोटी असते…पण ते समजले तर पुढचा करीयर शोधण्याचा प्रवास सुखकर होतो हेही सत्य स्विकारले पाहीजे…
आता त्याला गरज होती ती कौटुंबिक पाठींब्याची..त्याच्या निर्णयाचे स्वागत करण्याची आणि पुढचा टप्पा गाठायला मदतीची…आयुष्यातील लढाई तर त्यालाच पार करायची होती..आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासाने त्याला यश दिले नसले तरी अपयशही दिले नव्हतेच…कारण रोजच भरपूर विषयांवर वैचारीक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास त्याला खूप घडवत जात होता…बरोबरीचे दोन तीन मित्रही अधिकारी झाले होते हा आनंद होताच…फरक एवढाच असतो कि…तो त्या थडीला हा या थडीला…!अभ्यास तर सारखाच केलेला…मग ज्ञानाचे भांडार मिळाले हेच सकारात्मक भांडार स्विकारुन गौरव अखेर बाहेर पडला नव्या दिशेने नवा शोध घ्यायला…
दहावी बारावीच्या वयातच आयपीएसचे स्वप्न उराशी बाळगून गौरव अभ्यासाचे धडे गिरवत होता…जमेन तसे मिळेन तिथुन एक एक माहीती गोळा कळण्याचा त्याचा छंदच झाला होता…जसजसा मोठा होऊ लागला..छोट्याशा गावात आल्पशा ज्ञानात तो भर घालत रहायचा…सोशल मिडीया तोपर्यत हातात आले नव्हते..पुढे काॕलेज सुरु झाले तसे स्मार्टफोनने हातोहाती मदत करायला सुरवात केली…अगदी मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमाकडे सरकताना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागले…प्रत्येक संकल्पना समजून घेताना ए टू झेड चा प्रवास तो करत होता…पण तरीही जीवाची घालमेल आणि स्पर्धेशी पकड घेताना खूप काही कमतरताच भासत होती..
नातलग,गोतावळा कुटुंब सारच एका कोपऱ्यात बंदिस्त करुन टाकले होते त्याने…
स्पर्धा परीक्षेसाठी जाणारे प्रत्येक विद्यार्थी हे देशाचे ज्ञानवंत नागरीकच समजावे…बाकी यश – अपयश तर ठरलेलेच असते…कुणीतरी एखाद्या मार्काने जरी मागे राहीला तरच कुणीतरी पुढे जाणार ना! हे सत्य स्विकारले पाहीजे…कारण प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे.
नाहीतर कधीकधी संयमता हरवून नैराश्य येवून स्वतःलाच संपवलंही जातं…म्हणून या स्पर्धेत उडी घेताना अपयश आले तर परतीचा मार्गही सकारात्मकतेने बघितला पाहीजे…कारण मिळवलेले ज्ञान कधीच संपत नसते…!
सविता दरेकर