जऊळके वणीच्या विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची नवीन शाळा

जऊळके वणीच्या विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची नवीन शाळा
‘सुला विनयार्ड्स’च्या सीएसआर’ उपक्रमातून बांधली नवी इमारत

नाशिक : प्रतिनिधी

सुला विनयार्ड्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून (सीएसआर) जऊळके वणी येथे साकारण्यात आलेली शाळेची इमारत तेथील ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना हक्काची इमारत मिळाली आहे.
या हस्तांतरण कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, जऊळके वणीचे सरपंच योगेश दवंगे, उपसरपंच मंगला गांगुर्डे, ‘सुला’चे चीफ वाइनमेकर गोरख गायकवाड, असोसिएट व्हाइस प्रेसिडंट सिसिर पॉल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर हस्तांतरित केलेल्या नवीन शाळेचे उद्घाटन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गणपतराव पाटील म्हणाले की, या शैक्षणिक संकुलाचा लाभ गावातील विद्यार्थ्यांना होणार असून, अशा सामाजिक योगदानाबद्दल ग्रामस्थ ‘सुला’चे आभारी आहेत. जऊळके वणीचे ग्रामस्थ कायम ‘सुला’सोबत राहतील.
गोरख गायकवाड यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या अशाच शाळेतून शिकत माझा प्रवास घडला. एक चांगली शाळा कशी विद्यार्थी घडवते, तिचे त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात काय योगदान असते, याची मला जाण आहे. या शाळेत शिकून विद्यार्थी खूप मोठे होतील व भविष्यात या गावातून उच्चपदस्थ अधिकारी निर्माण होतील, असा विश्वास वाटतो. तसेच आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल जऊळके वणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आभार गायकवाड यांनी मानले.

सरपंच दवंगे यांनी ‘सुला’बाबत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच असेच सहकार्य सुलाने पुढेही जऊळके वणी साठी व जऊळके वणीच्या प्रगतीसाठी सुलाने आमच्या सोबत राहावे असे ते म्हणाले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सुला’च्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या शैक्षणिक संकुलाची संकल्पना असलेले व गावाच्या उत्कर्ष समितीचे सदस्य प्रकाश दवंगे, साहेबराव पाटील, भाऊसाहेब पाटील, ग्रामसेवक संतोष नवले यांना सुला तर्फे गौरवण्यात आले.
यावेळी कै. वसंतराव डोखले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकम, जिल्हा परिषद शाळेचे प्रमुख नाठे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *