नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोडवर मध्य रात्री भर रस्त्यात धिंगाणा घालत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या युवक, युवतीवर गंगापूर पोलिसांनी अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे पोलिसांची प्रतिमा मालिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूम ला बदली केली आहे. जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल जवळ एक क्लब मधून नाईट पार्टी करून मध्याच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबत ची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली. तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर अशोक साळवे (30) रा. पवन नगर, सिडको, वैशाली वाघमारे नाशिकरोड, भूमी ठाकूर(19)भाभा नगर,आलटमश शेख, वडाळा गाव, दोन बाऊनसर, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेल चालकवरही गुन्हा दाखल केला आहे.