नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या
सिडको : विशेष प्रतिनिधी
पतीच्या निधनानंतर पत्नीने सासरच्या मालमत्तेत हिस्सा मागीतल्याच्या वादातून जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन कुटुंबीयांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. महिलेने हिस्सा मिळावा म्हणून कोर्टात केस दाखल केलेली आहे. मात्र, सासरची मंडळी हिंस्सा देण्यास तयार नाही. काल कोर्टात तारीख होती. त्यावेळी न्यायालयाच्या बाहेर आलेल्या महिलेच्या सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाली. नणंद आणि भावजय यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तर पुरुष मंडळींनीही एकमेकांना अश्लील शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आवारात पोलिस असताना पोलिसांसमोरच ही तुंबळ हाणामारी झाली. यावेळी काही बघ्यांनी हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने तो तुफान व्हायरल झाला.