काँग्रेस मेळावा
नाशिक : प्रतिनिधी
वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी त्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे. त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु असल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केली आहे.
सपकाळ यांनी नाशिक दौर्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळावा काँग्रेस भवन येथे घेतला.
सपकाळ म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत ते म्हणजे वक्फ बोर्ड. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित अशी मागणी झाली, त्यासाठी 1913 साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावीत यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत खा. डॉ. शोभाताई बच्छाव, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, माजी आ. शिरीष कोतवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रीज दत्त यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरटकर, सोलापूरकरवर कारवाई करा
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणार्या राहुल सोलापुरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते, प्रशांत कोरटकरनेही महाराजांचा अपमान केला आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरु आहे पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. आता भाजपाचा कोणी केंद्रीय मंत्री रायजगडाला भेट देणार आहे असे समजले. भाजपाला जर खऱेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.