सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील सायबर पोलीस ठाण्याने एक महत्त्वपूर्ण आणि जलद कारवाई करत फिर्यादीला 48 तासांत सायबर फसवणूक झालेली साडेतीन कोटी रुपये परत केले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या जनतेचे शासक नाही तर सेवक या कल्पनेला मूर्त रूप देणारी ठरली.
याबाबत माहिती अशी की दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यांनी सांगितले की, एक अनोळखी व्यक्ती त्यांना फोन करून सांगितले की त्यांचे कुरीअर आले आहे. कुरीअर घेण्यासाठी त्यांनी मोबाइलवर आलेला ओटीपी पाठवा असे सांगून त्या व्यक्तीने त्यांचा मोबाइल हिसकावला आणि तो घेऊन पळून गेला. फिर्यादीच्या दोन्ही बँक खात्यांना जोडलेला मोबाइल लांबवला गेल्यामुळे त्यांना बँक खात्यातून पैसे चोरीला जातील.अशी भीती वाटल्याने फिर्यादीने तत्काळ आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील अधिकार्यांना माहिती दिली.
शाखेतील अधिकारी यांनी खात्यांचे स्टेटमेंट तपासले आणि त्यात करंट खात्यातून 50 लाख रुपये व ओडी अकाउंटमधून 3 कोटी रुपये वर्ग झाल्याचे लक्षात आले. शाखा अधिकार्यांनी त्या खात्यांचे व्यवहार थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलली.
त्यानंतर, सायबर पोलीस ठाण्याने रकमेशी संबंधित एचडीएफसी बँकेच्या देवपूर शाखेतील खातेदाराचा शोध घेतला. तात्काळ बँक अधिकार्यांना संपर्क करून, फसवणुकीची रक्कम रोखण्याची सूचना दिली. त्या खातेदाराला नाशिक सायबर पोलीसांनी ताब्यात घेतले. दुसर्या दिवशी, खातेदाराने रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यात परत केली. सायबर पोलीस ठाण्याने दिलेल्या या तात्काळ आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने फिर्यादी यांना त्यांची रक्कम 48 तासांच्या आत परत मिळाली. या कार्यवाहीमध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व सहकारी यांचे महत्वपूर्ण योगदान होते, तसेच बँकांच्या सहकार्यामुळे ही फसवणूक उघडकीस आली.