सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मोहदरी – चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत २५ हेक्टर वरील गवत जळून खाक झाले. याशिवाय मोठ्या झाडांनाही आगीची झळ बसली. सोमवारी (दि.७) सकाळी १० वाजेच्या सुमारास चिंचोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारीच असलेल्या डोंगराला अचानक आग लागल्याने. चाऱ्यासाठी असलेले संपूर्ण गवताळ कुरण आगीत भस्मसात झाले.
तालुक्यातील चिंचोली गावाच्या बाजूला डोंगर उताराला असलेल्या वन विभागाच्या क्षेत्राला सोमवारी सकाळी आग लागली. ही बाब ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यानंतर वन विभागाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. येथील स्थानिक १५ ते २० ग्रामस्थांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. वन विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न अनेक तास सुरू ठेवला तरीही आग आटोक्यात आलेली नव्हती. डोंगरावर अग्निशामक वाहन जात नसल्याने अनेक अडचणी आल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वन परिक्षेत्रमंडळ अधिकारी सुजित बोकडे, वनविभागाचे वनरक्षक संजय गिते, गोविंद पंढरे आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आग लागल्यानंतर डोंगर उताराचा भाग असल्याने तेथे अग्निशामक बंबाचे वाहन येणे अशक्य होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी ओली बारदाने, फांद्या हातात घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले. सर्वत्र वाळलेले गवत असल्याने गवताची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. काही मोठ्या झाडांना आगीची झळ सोसावी लागली.