स्वामी विवेकानंदनगरला रस्ताकाम निकृष्ट

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची नागरिकांकडून मागणी
सिडको : विशेष प्रतिनिधी स्वामी विवेकानंदनगर परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण काम नुकतेच खासदार निधीतून करण्यात आले. या कामासाठी चाळीस लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदाराची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.
रस्ता कंत्राटीकरणाच्या कामाच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही एकही अधिकारी कामाची पाहणी करण्यास जागेवर उपस्थित राहिला नाही. स्थानिक माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांनी नागरिकांच्या वतीने याबाबत पत्राद्वारे संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. बिल अदा करणार्‍या अधिकार्‍यावरदेखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. शिवाय, पूर्वी 7 मीटर रुंद असलेला रस्ता आता केवळ 5 मीटरचा झालेला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहने रस्त्यावरच लावावी लागत आहेत, ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी घरात घुसण्याची शक्यता
आहे.
रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाच्या दरम्यान वापरलेले सिमेंट सैल व अत्यल्प प्रमाणात वापरण्यात आले असून, वार्‍याच्या झोतात उडणारे सिमेंट पाहून नागरिकांनी अनेक वेळा ठेकेदारास विरोध केला. यासंदर्भात तक्रार पत्रासोबत रस्त्याच्या सद्यस्थितीतील छायाचित्रेही सादर करण्यात आली आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी व कारवाई केली जावी, अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रभाग क्रमांक 29 मधील स्वामी विवेकानंदनगर परिसरात खासदार निधीतून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. या रस्त्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे किंवा मनपाचे कोणतेही अधिकारी फिरकले नाही. त्यामुळे ठेकेदाराने मनमानी करत रस्ता बनविला. यावेळी कोणतीही गुणवत्ता आणि नियंत्रण विभागानेदेखील डोळेझाक केली. त्यामुळे सदरील रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा असतानाही या प्रभागाच्या माजी नगरसेविकेने ना हरकत दाखला दिला. या प्रकारावरून सर्वच जण या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *