पथनाट्यातून कलाकारांचा संताप, ‘पलुस्कर’ सुरू होईपर्यंत आंदोलन

नाशिक ः प्रतिनिधी

पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवन नूतनीकरणानंतर गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने भारतीय जननाट्य संघ अर्थात इप्टाच्या कलाकारांनी पलुस्कर सभागृहाच्या बाहेर पथनाट्यातून महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संताप व्यक्त केला.
नाशिक शहरात प.सा. नाट्यगृह व महाकवी कालिदास कलामंदिर ही दोनच व्यावसायिक नाट्यगृहे आहेत. पण त्यांचा खर्च नवोदित कलाकारांना परवडणारा नाही. त्यासाठी पलुस्करसारखे मिनी थिएटर कलाकारांना सादरीकरणासाठी उपयुक्त ठरतात. महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत 2019 मध्ये चार कोटी रुपये खर्चून पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवन उभारले. पण तीन वर्षे उलटून कलाकार प्रेक्षकांसाठी खुले केले नाही.
हे नाट्यगृह सुरू करण्यासाठी तीन वर्षांपासून अनेक निवेदन, आंदोलन झाली पण आश्वासन, आउटसोर्सिंगसाठी दिले आहे, सरकारी काम आहे. याशिवाय कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने इप्टाच्या कलाकारांनी हा पवित्रा उचलला असून, जोपर्यंत पलुस्कर सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे कलाकारांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
पलुस्कर कधी उघडणार? सामाजिक माध्यमावर या चळवळीला वेग आला असून, शहरातील अनेक भागात ठिकठिकाणी असे फलक बघायला मिळत आहे. यावेळी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. आंदोलनात इप्टाचे अध्यक्ष तल्हा शेख, कलाकार ओम हिरे, प्रणव काथवटे, मानसी कावळे, गौरी तिडके, दिनेश शिंदे, हितेश महाले यांच्यासह इतर कलावंत, कलारसिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *