पारा 41 अंशांवर; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
मनमाड ः प्रतिनिधी
मनमाड शहरासोबत नांदगाव तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा 41 अंशांपर्यंत गेल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर येऊन मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे. महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. त्याशिवाय बाहेर पडू नये.उन्हात थोडा जरी त्रास जाणवत असेल तर तातडीने हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी, असे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नीलेश जेजुरकर यांनी केले आहे.
मनमाड शहरात, नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत असून, सध्या तापमान 41 अंशांपर्यंत गेले असून, राज्याच्या हवामान खात्याने देखील येत्या दोन ते तीन दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून, या कक्षात उन्हापासून त्रास होणार्या व्यक्तींना अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे.