सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. 11) प्रारंभ होत आहे. यात्रा कमिटीकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटीसह विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी सजविलेल्या रथातून भैरवनाथ महाराजांच्या मुकुटाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथ मिरवणुकीत भजनी मंडळे रथाच्या मागे भजने गात मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. रथाच्या स्वागतासाठी स्त्यांवर सडा – रांगोळी काढण्यात येते. यावेळी जागोजागी कावडधारकांची पूजा करून प्रसाद दिला जातो. घराघरातून भैरवनाथ महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. शुक्रवारी रात्री 9.30 ते 11 पर्यंत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. यात्रेच्या दुसर्या दिवशी शनिवारी (दि. 12) सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत पुष्कराज थिएटर प्रस्तुत लावण्य अप्सरा हा प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा/आर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. पाचोरे कुटुंबाकडे रथ हाकण्याचा मान असतो. रथाच्या मागे शेकडो कावडीधारक पहाटेच्या चार वाजेपासून तर सायंकाळपर्यंत अनवाणी पायांनी चालत असतात. अनेक कावडधारक कावडीद्वारे सामाजिक संदेश देत असतात. मिरवणुकीनंतर गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक घातला जातो. रथ ओढण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकरी बैलजोड्या घेऊन शहरात येत असतात.