सिन्नर : भरत घोटेकर
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामांसाठी दिले जाणारे 1 लाख 20 हजारांचे अनुदान तुटपुंजे असल्याने शासनाने त्यात 50 हजारांची वाढ केली आहे. त्यातील 35 हजार रुपये हे बांधकामासाठी तर 15 हजार रुपये अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरावर 1 किलोवॅटपर्यंत सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दिले जाणार आहेत.
सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित न करणार्या लाभार्थ्यांना 15 हजारांच्या अनुदानाचा लाभ देय राहणार नाही. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 तसेच विविध राज्यपुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50 हजार रुपये अतिरिक्त वाढ करण्यास शासनाने 4 एप्रिल 2025 च्या अध्यादेशान्वये ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. या 50 हजार रुपये रकमेमधून 35 हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर 15 हजार रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलो वॅट मर्यादेपर्यंत सौरऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणार्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील.
2030 पर्यंत साध्य करणार शाश्वत विकास ध्येय
राज्यात, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इत्तर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणार्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट देण्यात येणार नाही. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत सन 2024-25 ते 2028-29 मध्ये प्राप्त होणार्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 हा कार्यक्रम राबविल्यामुळे राज्यात शाश्वत विकास ध्येय हे सन 2030 पर्यंत साध्य करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून एक किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा घरावर कार्यान्वित करण्यासाठी सुमारे 50 ते 55 हजार रुपये खर्च येतो. त्यासाठी केंद्र शासनाकडून एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्या व्यतिरिक्त आणखी 15 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही मिळून 45 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे. वरचा 10 हजार रुपयांपर्यंतचा खर्च घरकुल लाभार्थ्यांना सोसावा लागणार आहे. मात्र, त्यातून त्यांची कायमस्वरूपी वीजबिलातून मुक्तता होणार आहे.
असे मिळणार घरकुलासाठी अनुदान
यापूर्वी घरकुल बांधकामासाठी शासनाकडून 1 लाख 20 हजार रुपये इतके अनुदान दिले जात. याशिवाय त्यात 27 हजार रुपये मजुरीपोटी लाभार्थ्यांना मिळत असे. आता घरकुल बांधकामाच्या अनुदानात 35 हजारांची वाढ केल्याने 1 लाख 55 हजार रुपये इतके अनुदान मिळेल. एप्रिल 2025 पासून रोजगार हमीची प्रतिदिन 312 रुपये इतकी मजुरी महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 90 दिवसांच्या मजुरीचे 28,080 रुपये लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल. तर घरावर सौर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 15 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. एकूण 1 लाख 98 हजार रुपये एकत्रित अनुदान घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल.
जिल्ह्यात मोफत 5 ब्रास वाळूची प्रतीक्षा
प्रधानमंत्री आवास योजनेतून नाशिक जिल्ह्यात 1 लाख 45 हजार 727 घरकुले मंजूर आहेत. पैकी निम्म्या लाभार्थ्यांना 15 हजारांचा पहिला हप्ता जमा झाल्याने त्यांचे बांधकाम सुरू आहे. पण, मोफत वाळू न मिळाल्याने बांधकामाचे बजेट वाढले आहे. आता राज्य सरकारच्या सुधारित वाळू धोरणांतर्गत मोफत वाळू मिळणार का, जिल्हा प्रशासन त्यासाठी काय उपाययोजना करणार, याची घरकुल लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे.