साडेतीनशे कोटींच्या अमृत योजनेला आठवड्याचा मुहूर्त

शहरातील जीर्ण जलवाहिन्या बदलणार

नाशिक : प्रतिनिधी
शहरात तीस वर्षांपूर्वी टाकलेल्या जीर्ण जलवाहिन्या बदलून नव्याने टाकण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीनशे कोटींचा खर्च येणार आहे. विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविल्याचा संशय आल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. नंतर काढलेल्या फेरनिविदेत पाच संस्थांनी सहभाग नोंदवला. कागदपत्रांची तपासणी सुरू असून, येत्या काही दिवसांत 342 कोटींच्या कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

शहराची लोकसंख्या सन 2050 पर्यंत 55 लाखांच्या घरात पोहोचणार असून, नागरिकांची तहान भागविणे मनपासाठी मोठे आव्हान आहे. सुरळीत पाणीपुरवठा व नव्या जलवाहिन्या टाकण्यासाठी केंद्राने अमृत-2 योजनेतंर्गत मनपाने 342 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली असून प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पन्नास टक्के खर्च केंद्र करणार आहे.
राज्य सरकार व महापालिका पंचवीस टक्के खर्च करेल. एप्रिल अखेर या निविदेची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लागण्याची शक्यता आहे. नव्याने निविदा काढण्यात आली असता त्यात पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत दोन योजना शहरासाठी वरदान ठरणार आहे. यातून संपूर्ण शहरासह नवीन वसाहतीत जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांचे आयुर्मान तीस वर्षापेक्षा अधिक आहे. यामुळे पाणी गळतीची मोठी समस्या असून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिक रोष व्यक्त करतात. यासाठी अमृत-2 योजनेतंर्गत तब्बल 342 कोटी खर्चून शहरात जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार आहे.

या कंपन्यांचा सहभाग

  • लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस
    कोया अ‍ॅण्ड कंपनी कन्स्ट्रक्शन्स
    जे डब्ल्यू इन्फ्रा
    इगर इन्ग्रा
    भूगन इन्फ्राकॉन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *