वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल

वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल/मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनियम 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनियम 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.
त्याप्रमाणे नाशिक परिमंडल अंतर्गत येणाऱ्या नाशिक, मालेगांव व अहिल्यानगर मंडळातील वीजग्राहकांना एप्रिल महिन्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या बिलामध्ये नमूद सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी जास्तीत जास्त सहा मासिक समान हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंबंधीची माहिती सुरक्षा ठेवीच्या बिलामध्ये नमूद आहे. तसेच लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *