तहसीलदारांच्या उपस्थितीत आज रौप्य आणि कांस्य पदकाने होणार सन्मान
सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त झालेल्या सिन्नर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना कांस्यपदक तर 3 ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन गौरवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पंचायत दिनाचे औचित्य साधून आज गुरुवारी (दि.24) सिन्नर पंचायत समितीच्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात दुपारी 3 वाजता तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, तालुका क्षयरोग अधिकारी प्रकाश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागामार्फत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत, माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात आले होते.
तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती पहिल्या वर्षी कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. तर सलग दुसर्या वर्षी क्षयरोगमुक्त झाल्याने तीन ग्रामपंचायतींना रौप्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
तीन ग्रामपंचायतींना रौप्यपदक
सलग दुसर्या वर्षी क्षयरोगमुक्त राहणार्या ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा तालुक्यातील देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत फर्दापूर, पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आगासखिंड आणि दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दोडी खुर्द या तीन ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
असे आहेत पुरस्काराचे निकष
* एक हजारमध्ये तीसपेक्षा अधिक संशयित रुग्णांची तपासणी.
* एक हजारांमध्ये एकपेक्षा कमी रुग्ण. * रुग्ण बरे होण्याचे 85 टक्क्याहून अधिक प्रमाण. * ड्रग सेन्ससिटिव्हिटी 60 टक्क्याहून अधिक प्रमाण. * क्षयरुग्णासाठी उपचारासह पोषण कीट व अन्य सुविधांची 100 टक्के उपलब्धता. * क्षयरुग्णासाठी 100 टक्के निक्षय मित्र तयार करणे. * पहिल्या वर्षी ब्रांझ, दुसर्या वर्षी सिल्व्हर व तिसर्या वर्षी सुवर्णपदक पुरस्कार देण्यात येतात.