सावानाच्या वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण
नाशिक : प्रतिनिधी
पुस्तकांत माणसांना समृद्ध करण्याची शक्ती असते. पुस्तक वाचनातून व्यक्तींच्या विचारांना चालना मिळते. पुस्तक ही जगण्याची दिशा देतात. त्यासाठी तरुण पिढीने वाचन करायला हवे. वाचाल तरच वाचाल, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने देण्यात येणारे 2024 चे विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते बुधवार दि.23 रोजी सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष प्रा. सुनील कुटे, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, रमेश धोंडगे, सुनंदा अमरापूरकर, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष संजय करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वत:ला वाचनाची सवय जडली, त्यामुळे उत्तमोत्तम पुस्तके मुलांच्या हातात द्या. वाचनाने माणूस समृद्ध होतो, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. यानंतर पुरस्कारार्थींचा परिचय प्रा. सुनील कुटे, सावानाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर आणि ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी करून दिला. परीक्षकांच्या वतीने प्रा. अनंत येवलेकर यांनी तर पुरस्कारार्थींमधून प्रा. रमेश धोंडगे, सुनंदा अमरापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सावानाचे प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांनी प्रास्ताविक केले. अर्थ सचिव गिरीश नातू यांनी सूत्रसंचालन केले. आभार ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी मानले. यावेळी नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, वास्तुसंग्रहालय सचिव अॅड. अभिजित बगदे, प्रा. शिशिर शिंदेकर, डॉ. चंद्रकांत संकलेचा, वंदना अत्रे, प्रा. सुनील हिंगणे आदी उपस्थित होते.