मोह शिवारात विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील मोह येथे 60 फूट खोल विहिरीत पडून काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.23) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हरणांची वारंवार शिकार होत असते. बिबट्याच्या पाठलागामुळे भेदरलेल्या काळवीटाला अंदाज न आल्याने त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असावा, असा संशय वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. मोह येथील तुकाराम भिसे यांच्या शेत गट नंबर 57 मधील विहिरीत काळवीट पडले असल्याची माहिती बुधवारी सकाळी शेतकरी अरुण सय्यद यांनी विभागाला दिली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वन परिमंडळ अधिकारी सुजित बोकडे, वनरक्षक गोविंद पंढरे यांच्यासह सिन्नर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. 60 फूट खोल असलेल्या विहिरीत सुमारे 15 फूट पाणी होते. रेस्क्यू टीमने जाळी टाकून काळविटाला विहिरी बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी चिंचोले यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मोहदरी येथील वन उद्यानातील वन्यप्राण्यांच्या स्मशानभूमीत काळविटाला अग्नीडाग देण्यात आला. काळवीट अंदाजे 5 वर्षांचे असल्याचे वन परिमंडळ अधिकारी सुजित बोकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *