सोग्रस : चांदवड तालुक्यातील हरणूल व हरसूलच्या शिवारात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बछड्यांसह बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात वनविभागाच्या वतीने दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. चांदवड तालुक्यातील हरणूल व हरसूल परिसरातील डोंगरावर या परिसरातील नागरिकांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. यांसह बरोबर एक बिबट्या चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील सुतारखेडे शिवारात तसेच चांदवड तहसील कार्यालयाच्या पाठीमागील डोंगरात नागरिकांना आढळून आला आहे. शिकारीच्या तसेच तीव्र उन्हामुळे पाण्याच्या शोधात बिबटे फिरत असतात. मात्र, रात्रीच्या वेळी बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. त्यामुळे वनविभागाने या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी हरणूल व हरसूल गावच्या शिवारात दोन पिंजरे लावलेले आहेत.