‘माती मागतेय पेनकिलर’ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

चांदवड ः वार्ताहर
तंत्रज्ञानाच्या युगात मातीतून अंकुरलेली कविता आणि शोषितांच्या व्यथांना शब्दरूप देणार्‍या युवा कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या ‘माती मागतेय पेनकिलर’ या प्रभावी काव्यसंग्रहास प्रतिष्ठित ‘लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साहित्यिक कवी संदीप जगताप आणि शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुरस्काराने युवा कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या साहित्य प्रवासातील महत्त्वपूर्ण योगदानाला सन्मानित केले आहे.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी दीडशेहून अधिक काव्यसंग्रहांमधून ‘माती मागतेय पेनकिलर’ या संग्रहाची निवड झाली. निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी पुरस्काराची घोषणा करताना सांगितले की, “शेतकरी, श्रमिक आणि भूमिपुत्रांच्या कष्टाच्या कहाण्यांना एका नव्या दृष्टिकोनातून मांडणारी ही कविता केवळ सामाजिक जाणीवच नाही, तर ती एक वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक ओळख निर्माण करते.”
मॅग्नस फार्म येथे लवकरच आयोजित होणार्‍या समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह,
सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे.
‘माती मागतेय पेनकिलर’ या काव्यसंग्रहात कवी सागर जाधव जोपुळकर यांनी ग्रामीण जीवनातील दुःख आणि अडचणींचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. पेरणीपासून ते आत्महत्येच्या कठीण वाटेवर असलेल्या भूमिपुत्रांच्या वेदनांना त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केले आहे. त्यांच्या कवितेतील प्रतिमा, भाषिक प्रयोग आणि ग्रामीण बोलीतील जिवंतपणा वाचकांना आकर्षित करतात.
या महत्त्वपूर्ण सन्मानाबद्दल राज्यातील अनेक साहित्यिक, समीक्षक आणि रसिकांनी कवी सागर जाधव जोपुळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार त्यांच्या संवेदनशील लेखणीचा आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा गौरव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *