धरणांतील जलसाठा 40 टक्क्यांंच्या आत; 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा
पळाशी ः यशवंत ताडगे
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने सूर्य आग ओकत आहे. नांदगाव तालुक्याचा तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर गेला आहे. लहान-मोठ्या धरणांतील जलसाठा 40 टक्क्यांच्या आत आला आहे. पाणीपुरवठा करणार्या योजना मृगजळ ठरत आहेत.
तालुक्यात सद्यस्थितीत 38 वाडे-पाडे व गावांना 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गिरणा धरणातील जलसाठा अवघ्या 30 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. तर नांदगाव तालुक्यातील पळाशी, सावरगाव, मंगळणे, वेहेळगाव व चाळीसगाव तालुक्यांतील 28 गावांना वरदान ठरणार्या मन्याड धरणाचा जलसाठा अवघा 28 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्प माणिकपुंज, नाग्यासाक्या बंधारे, लोहशिंगवे, कासारी, भालूर, रणखेडा यातील जलसाठा 25 टक्क्यांच्या आत आहे. पाणीपुरवठा करणार्या योजनांचे उद्भव स्रोत कोरडे पडले आहेत. काही पाणीपुरवठा योजना मृगजळ ठरत आहेत. नांदगाव व मनमाड शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव शहरासाठी नवीन गिरणा धरणाचा जलसाठ्यातून तर मनमाडसाठी करंजवण धरणातून मंजूर करून आणलेली पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या जलसाठ्यातून नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहरासह न्यायडोंगरी, मालेगाव शहर, 56 खेडी पाणीपुरवठा योजना व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठा केला जातो. जळगाव एमआयडीसी, नांदगाव तालुक्यातील 56 खेडी पाणीपुरवठा योजना आधारित आहे. गिरणा धरणाच्या जलसाठ्यातून जळगाव जिल्ह्यासाठी तीन आवर्तन सोडल्याने व वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे गिरणा धरणाचा जलसाठा अवघ्या 30 टक्के आहे. अजून जळगाव जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येतील. पाणी सोडल्याने जलसाठ्यावर परिणाम होणार आहे. एका आवर्तनातून 5 टक्के जलसाठा कमी होत असतो. गेल्या काही महिन्यांत सिंचनासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यामुळे धरणाचा जलसाठा 100 टक्क्यांवरून थेट 47.64 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. पुढील तीन महिने उन्हाचा प्रभाव कायम राहणार असल्याने धरणातील पाणी टिकवणे मोठे आव्हान ठरणार आहे. मागील वर्षी चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होता. गिरणा धरण 100 टक्के भरले होते, मात्र पावसाळ्यापूर्वी ते फक्त 11 टक्के शिल्लक राहिले होते. गिरणा धरण 1969 मध्ये पूर्ण झाल्यापासून गेल्या 53 वर्षांत 14 वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा गिरणा धरणातून सिंचनासाठी 3 आणि बिगर सिंचनासाठी 4 असे एकूण 7 आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. त्यातील 3 आवर्तने आतापर्यंत सोडण्यात आल्याने धरणाचा जलसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. गिरणा धरणातून 50,000 हेक्टर सिंचन क्षेत्र, मालेगाव महानगरपालिका, नांदगाव, चाळीसगाव आणि इतर शहरे तसेच 154 गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. धरणाची एकूण 21,500 दलघफू क्षमतेपैकी सध्या 8,813 दलघफू पाणी शिल्लक आहे.
नांदगाव पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, एप्रिल ते जूनदरम्यान 74 वाड्यांना 36 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु या शासकीय आकडेवारीपेक्षा वास्तविकता अनेक वाडे-पाडे येथे पाणीटंचाई जाणवत आहे. ग्राउंड लेव्हलवर जाऊन पाणीटंचाई असलेल्या गावांचा समावेश केला नाही असे दिसते. काही गावांचा टँकर प्रस्ताव तयार करण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्या विहिरींचे पाणी पिण्यालायक आहे की नाही, याबद्दल तालुक्यातील यंत्रणा अनभिज्ञ आहे.
नांदगाव तालुक्यातील गावांमध्ये जिल्ह्यात सर्वांत जास्त टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी नांदगाव तालुक्यात 60 गावांना 77 टँकरद्वारे 338 वाड्यावस्त्यांना 170 फेर्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यंदा पंचायत समितीच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून, एप्रिल ते जूनदरम्यान 33 गावे 74 वाड्यांना 36 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.