मालेगाव ः वार्ताहर
तालुक्यासह कसमादेतील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असून, त्यांचा फळपिकांकडे कल वाढला आहे. उन्हाळ्यात मागणी असलेल्या टरबुजाची कसमादेत 880 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. बाजारात टरबुजाचे भाव टिकून असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतात पालेभाज्या, मिरची, वांगे, शेवगा, टोमॅटो, ड्रॅगन फूड आदी पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न काढत आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसांत टरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे कसमादे पट्ट्यात 880 हेक्टर क्षेत्रावर यंदा टरबूज पिकाची लागवड करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यातील उन्हाचा पारा 43 अंशांपर्यंत पोहचला आहे. या दिवसांत थंड शीतपेयांची मागणी वाढली आहे.
नागरिक उन्हापासून बचावासाठी फळे खाणे पसंत करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबुजाला बाजारात वाढती मागणी आहे. शहरातील सोमवार बाजार, एकात्मता चौक, टेहरे चौफुली, सटाणा नाका, रावळगाव नाका, सरदार चौक आदींसह रस्त्यावर शेतकरी बांधव किरकोळ टरबूज विक्री करताना दिसून येतात.
20 रुपये किलो व 30-40 रुपये नगाने मोठे टरबूज विक्री होत आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी थेट बांधावरून माल खरेदी करत असल्याने बाजारात टरबुजाची लाली कायम असल्याने शेतकर्याला आर्थिक फायदा होत आहे.
बाहुबली टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन शेतकर्यांना मिळत असल्यानेे बळीराजाची आर्थिक परिस्थिती काही अंशी सुधारली आहे.