नांदूरमध्यमेश्वर कालवे दुरुस्तीत वरवरची मलमपट्टी

निफाड ः आनंदा जाधव
सुमारे 120 वर्षांपूर्वी बांधलेल्या नांदूरमध्यमेश्वर कालव्यांची वहनक्षमता घटल्याने गोदावरी पाटबंधारे विभागाकडून या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च होत असतानाही कालव्याची सुधारणा होताना दिसत नाही. यावर्षीदेखील कालव्यातील गाळ काढून कमकुवत झालेल्या ठिकाणी कालव्याला भराव देण्यासाठी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीसाठी 55 कोटी रुपये मंजूर करून काम हाती घेतले आहे. काम करणार्‍या ठेकेदाराने पोकलेनच्या सहाय्याने वरवरचा गाळ काढून तो कालव्याच्या उतारावर टाकल्याने कालव्यांना पाणी सोडल्यानंतर हा गाळ पुन्हा कालव्यात जाऊन या कामावर खर्च होणारे करोडो रुपये पाण्यात जाणार आहे.
दरम्यान, या कालव्याला भराव देण्याबरोबरच कालव्यालगतची काटेरी झुडपे काढणे गरजेचे असतानाही ती काढली जात नसल्याने हे काम म्हणजे ठेकेदार पोसण्यासाठी केलेली तजवीज ठरत आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात खोदलेले नांदूरमध्यमेश्वर धरणाचे कालवे आता अतिशय जीर्ण झाले आहेत. अनेक ठिकाणी हे कालवे फुटून पाण्याचा अपव्यय होत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी या कालव्यांची दरवर्षी दुरुस्ती केली जाते. मात्र, अद्यापही या कालव्यावरील पूल जीर्ण असून, अनेक ठिकाणी कालव्यांचा भराव कमकुवत झालेला आहे. साहजिकच दरवर्षी या कालव्यांसाठी खर्च केला जातो. आतादेखील नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या, डाव्या आणि जलद कालव्यातील शेवाळ माती काढण्याबरोबरच कालव्याच्या आतील भागाला व्यवस्थित उतार देणे, कालव्यात असणारी काटेरी झुडपे काढून कालव्याची वहनक्षमता वाढावी यासाठी पाटबंधारे विभागाने 55 कोटी रुपये मंजूर करीत या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी दोन पोकलेनच्या सहाय्याने वरवरचा गाळ काढून तो कालव्याच्या उतार भागावर टाकला जात आहे. कालव्यात आणि कालवा उतारावर असणारी काटेरी झुडपे, बाभळी, बोरी अशी झाडे तशीच ठेवल्याने पाणी वहनक्षमतेत अडथळा ठरण्याची शक्यता अधिक आहे. अनेक ठिकाणी कालव्यात असणारे शेवाळ तसेच दिसत आहे. तर कालव्यात खोलगट भाग तर काही ठिकाणी उंच भाग तसाच ठेवला आहे. जेथे कालव्याचा भराव कमकुवत आहे, तेथे देखील माती, मुरूम टाकून भरावाला आधार देण्याचे कुठलेही कष्ट घेतलेले नाही. केवळ टक्केवारी आणि पदाधिकारी यांचे खिसे भरण्यासाठीच दरवर्षी या कालवा दुरुस्तीची निविदा काढून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याची चर्चा आहे. सध्या कालव्याचे जे काम घाईघाईत उरकले जात आहे, त्याबाबत संबंधित ठेकेदाराला योग्य समज देत कालव्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून घेऊन कालवा लगतच्या काटेरी झुडपे काढण्याची ताकीद द्यावी, अशी मागणी होत आहे.

दुरुस्तीचे काम निकृष्ट

कालव्यातील गाळ काढण्याचे काम निकृष्ट होत असून, एकाच दिवसात सुमारे 15 कि.मी.पर्यंत कालव्यातील गाळ काढल्याचे दाखविले जात आहे. कालव्यात अद्यापही गाळ तसाच असून, उतार व्यवस्थित दिलेला नाही. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करून काम व्यवस्थित करावे. संजय उबाळे, शेतकरी, नांदूरमध्यमेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *