नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर धरण समूहातून मंगळवारी (दि.29) एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जलसंपदा विभागाने एकलहरे औष्णिक वीज केंद्र व इतर कामांसाठीचे नियोजित आवर्तन सोडले. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी पात्रातून पाण्याचा प्रवाह होत नसल्याने नदीतील पाणी दूषित झाल्याचे चित्र होते. मात्र, मंगळवारी पाणी सोडताच गोदावरी खळाळून वाहत होती.
पंचवटीत देशभरातून भाविक स्नानासाठी व धार्मिक कार्य करण्यासाठी येत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोदावरी प्रदूषित झाल्याने गोदाप्रेमींसह नागरिकांकडून प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. काही दिवसांपासून एकाच ठिकाणी पाणी साचल्याने पाण्याचा रंग काळसर झाल्याचे चित्र होते. सोमवारी पाण्याचा विसर्ग करताच गोदावरी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली. यावेळी पंचवटीतील छोट्या मंदिरांसह रामकुंड, लक्ष्मीकुंड पाण्याखाली गेली. शहरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. परंतु गोदेला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना सुखद अनुभव मिळाला.
गोदावरीतील पाणवेलींचा प्रश्न मागील काही वर्षांपासून जटिल बनला आहे. मुख्यत: उन्हाळ्यात गोदापात्र पाणवेलींनी व्यापल्याचे जागोजागी दिसते. परिणामी, गोदा प्रदूषित होत आहे. सोमवारी पाण्याच्या प्रवाहात मोठ्या संख्येने पाणवेली पंचवटी परिसरात वाहून आल्या. महापालिकेच्या कर्मचार्यांकडून सदर पाणवेली काढण्याचे काम सुरू होते. गोदावरी पात्रात पाणी आल्याने नागरिकांची पंचवटीतील गोदातीरी गर्दी झाली होती. गोदावरी पात्रात कोणीही थांबू नये, याबाबतची
खबरदारी प्रशासनाने घेतली होती. ऐन उन्हाळ्यात गोदावरीला
पूर आल्याचे चित्र मंगळवारी
दिसून आले.