सोमठाणे येथील धोक्रट कुटुंबाचा समाजापुढे आदर्श
निफाड : प्रतिनिधी
जमीन मोजणीमध्ये साडेसतरा गुंठे क्षेत्र जादा आल्याने ते लगतच्या शेतकर्यास प्रामाणिकपणे परत करण्यात आल्याची घटना सोमठाणे येथे घडली आहे.
सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील गोदावरी उजव्या कालव्यालगत मधुकर सूर्यभान धोक्रट यांची साडेदहा एकर जमीन आहे. त्या जमिनीलगत 283 व व 284 हे छोटे भूमापन गट असून, सोमठाणे येथील रामेश्वर सोपान कोकाटे व ज्योती रामेश्वर कोकाटे या पती-पत्नीच्या नावावर साडेसहा एकर जमीन आहे. धोक्रट कुटुंब त्यांच्या व्यवसायामुळे पूर्वी अनेक वर्षे ही शेती करत नव्हते. त्यामुळे ही सर्व शेती 15 ते 20 वर्षे पडीक होती. जमिनीची वहिवाट नसल्यामुळे सर्व गटातील बांध वेडेवाकडे झाले होते. त्यामुळे त्या क्षेत्रातील निशाणी दिशा, बांध, वाटा या काही समजत नव्हत्या. त्यामुळे याची खात्री करण्यासाठी या जमिनीची रामेश्वर कोकाटे यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेतली. त्यावेळी मोजणी अधिकार्यांच्या अहवालानुसार साडेसतरा गुंठे क्षेत्र हे धोक्रट यांच्याकडे निघाले असल्याचे सांगितले. त्यामुळे सोमठाणे येथील मेडिकल व्यावसायिक मधुकर सूर्यभान धोक्रट यांनी सदरची जमीन मोजणीबाबत कुठल्याही प्रकारे अपील न करता मोजणी अधिकार्यांच्या अहवालानुसार रामेश्वर सोपान कोकाटे यांना साडेसतरा गुंठे जमीन क्षेत्र बांध टाकून काढून दिली आहे. धोक्रट कुटुंबीयांची सदर गटात वडिलोपार्जित शेती आहे व आजच्या परिस्थितीत सोमठाणे येथे 25 ते 30 लाख रुपये एकर जमिनीचा भाव आहे. परंतु समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा हे विचार मनात ठेवून सदरच्या गटात अतिरिक्त निघालेली साडेसतरा गुंठे जमीन रामेश्वर कोकाटे यांना कुठलाही वादविवाद न करता मोजणी अधिकार्यांच्या अहवालानुसार रामेश्वर कोकाटे यांना परत दिल्याचा आदर्श धोक्रट कुटुंबीयांनी समाजापुढे उभा केला आहे.