मंगरुळ : एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दर्शनी फलकावर विद्यालयाचे कलाशिक्षक काशीनाथ अहिरे यांनी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे कविवर्य राजा नीळकंठ बडे लिखित राज्यगीताचे सुलेखन केले आहे. प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा सर्वांसाठीच असल्याने विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य गीताची ओळख आणि राज्य गीताचे वाचन व्हावे, हा प्रमुख उद्देश आहे. तसेच राष्ट्राच्या जडणघडणीत या मायमातीतील शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे अमूल्य योगदान आहे. यामुळे यांच्या श्रमाला मोल लाभो सर्वदा अन् घामाला मिळो दाम, हातांना मिळो काम आणि या कामाला मिळो सन्मान या संदेशातून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.