दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातून ऐन उन्हाळ्यात अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून पोलीस बंदोबस्तात सकाळी दहाच्या दरम्यान तिसरे आवर्तन सोडल्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. त्याचवेळी तत्काळ वणी ग्रामपालिका उपसरपंच विलास कड व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड व पांडाणे धनाई माँ ठिबक उपसा सिंचन संस्थेचे पदाधिकारी, सभासद व पुणेगाव धरणावर उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेल्या चौदा गावांतील शेतकरी यांनी एकत्र येऊन आक्रमक पवित्रा घेतला.
त्यावेळी संबंधित विभागांचे उपस्थित कर्मचारी व शेतकरी यांच्यामध्ये कालव्यात सोडलेले पाणी बंद करण्यावरून शाब्दिक चकमक पहावयास मिळाली. त्यावेळी कार्यकारी अभियंता वैभव भागवत व उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी यांच्या आदेशान्वये कर्तव्य बजावणे आम्हास भाग पडले, असे उपस्थित कर्मचार्यांकडून शेतकर्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शेकडो शेतकर्यांच्या डोळ्यातील आक्रमकता शिगेला पोहचल्याचे स्पष्ट दिसून येत होते. त्यावेळी कुटे, पाटील, जाडर, चव्हाण व त्यांच्यासह कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. त्यानंतर लगेचच सभापती प्रशांत कड आणि उपसरपंच विलास कड यांनी प्रातिनिधित्व व शेतकर्यांच्या आग्रहास्तव कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी, निवासी नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्याशी फोन करून संवाद साधला व घटनास्थळी येण्याचे सांगण्यात आले. ज्यावेळी वरील अधिकारी घटनास्थळावर पोहचले त्यावेळी पुणेगाव कालव्यावरील चांदवड, येवल्याच्या लाभार्थींचे यापूर्वीचे दोन नियोजित आवर्तन ( 304 द.ल.घ. फूट इतके) त्यांच्या मागणीनुसार पूर्ण दिले गेले आहेत व आम्ही आमच्या केलेल्या मागणीनुसार व त्यावर आकारलेला ( महसूल) कर भरून त्यातून सर्वांनी बचत करून शिल्लक ठेवलेल्या पाण्यातून तुम्ही तिसरे आवर्तन कसे सोडत आहे, अशी एकमुखाने विचारणा करण्यात आली. त्यावेळी यासंदर्भात उर्वरित जिवंत पाणीसाठा सतरा द.ल.घन फूट आहे म्हणून कालव्यावरील लाभार्थी आणि चांदवडचे लोकप्रतिनिधी आ. राहुल आहेर यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पुणेगावचे पाणी सोडण्याबाबत बैठक घेतली. त्यावेळी पाणी सोडण्याचे
निर्देष देण्यात आले, असे चौदा गावांतील उपस्थित उपसा सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांना सांगण्यात आले. त्यावर शेतकरी म्हणाले की, आमच्या तालुक्याचा वास्तव इतिहास हा फक्त आमचे लोकप्रतिनिधी तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनाच माहीत असून त्यांनी समक्ष पाहणी करेपर्यंत आम्ही आमच्या हक्काचे एक थेंबही पाणी सोडू देणार नाही व आमचे आरक्षित पाणी कालव्याद्वारे सोडल्यास किंवा तसा प्रयत्न झाल्यास आम्ही शेकडोंच्या संख्येेने कालव्यात बसून आंदोलनाची तयारी ठेवू, असे दिं.कृ.उ.बा.स. सभापती प्रशांत कड यांनी ठणकावून सांगितले व कार्यकारी अभियंता वैभव भागवत व उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी तसेच निवासी नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपसरपंच विलास कड, सभापती प्रशांत कड, उत्तम जाधव, एस. टी. कड, आनंदा चौधरी, सुनील बर्डे, राकेश थोरात, संजय वाघ, भोजराज चौधरी, चंद्रभान दुगजे, बबन धुळे, संजय उगले, पंडीत बागुल, सोमनाथ चौरे, श्रीराम महाले, प्रवीण पगार, संतोष रहेरे आदी उपस्थित होते.