कॉर्पस फंड गैरव्यवहार ः 2 कोटी रुपयांची अफरातफर

चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
तपोवन रोडवरील कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटमधील तब्बल 2 कोटी 26 लाख 40 हजार 400 रुपयांच्या कॉर्पस फंड गैरवापर प्रकरणी मुंबईतील चार भागीदारांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अभिजित धनंजय वानखेडे (वय 40, कर्मचारी – विकास अधिकारी, पोस्ट ऑफिस, नाशिक व चेअरमन, कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंट, तपोवन रोड, द्वारका) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, 2013 ते 2024 या काळात अपार्टमेंटमधील 163
सदनिकाधारकांकडून कॉर्पस फंड म्हणून 2 कोटी 26 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती.
सदर फंड मेसर्स कर्मा रिअ‍ॅलिटी या विकासक कंपनीमार्फत घेतला गेला. या कंपनीचे भागीदार विनोद मदनलाल तलवार, सुनील देवीसहाय गुप्ता, चंद्रा विनोद तलवार आणि कविता सुनील गुप्ता (सर्व रा. ओशिवारा, न्यू लिंक रोड, मुंबई) यांनी ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही किंवा माहितीपत्रकानुसार सुविधा पुरवल्या नाहीत. त्यांनी हा मोठ्या प्रमाणावर जमा झालेला कॉर्पस फंड स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी व इतर फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देशमुख, मोहिते, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. पी. सपकाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *