नाशिकरोडमध्ये गॅसचा काळाबाजार

63 सिलिंडरसह तिघे जेरबंद

सिडको : विशेष प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस अवैधरीत्या खासगी वाहनांमध्ये भरणार्‍या टोळीवर गुन्हे शाखा युनिट-2 ने मोठी कारवाई केली आहे. पाटील गॅरेजच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या धोकादायक कारवाईतून 63 गॅस सिलिंडर, 3 वजनकाटे, 3 मशीन व इतर मुद्देमाल असा एकूण 2 लाख 11 हजार 700 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी अशा अवैध गॅस व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार युनिट-2 चे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना सपो उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
दि. 3 मे 2025 रोजी पथकाने सापळा रचून छापा टाकला असता, शिवा दिनेश लोणारे (रा. नाशिकरोड), शाकीर मोहम्मद शहा आणि नवाझ अहमद शहा (दोघे रा. सुंदरनगर झोपडपट्टी) हे आरोपी गॅस सिलिंडरमधून खासगी वाहनात मशीनद्वारे गॅस भरताना आढळले. या आरोपींविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गीरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *