मनमाड : आमिन शेख
चोरी करणारे चोर विविध शक्कल लढवून चोरी करत असतात. चोरीचे प्रकार ऐकून कधीकधी हसायलाही येते. मनमाडलादेखील असाच एक चोरीचा प्रकार समोर आला असून, भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई ते मनमाड या पाइपलाइनला थेट टॅप करून नळ कनेक्शन करतो त्याप्रमाणे थेट पाइपलाइन द्वारे दूरपर्यंत कनेक्शन करण्यात आले. तब्बल 48 फुटांपेक्षा जास्त पाइपलाइन लावून नळ कनेक्शन जोडतो त्याप्रमाणे जोडून त्या पाइपलाइनमधून हजारो लिटर डिझेलची चोरी करण्यात येत होती. काल एका शेतकर्याच्या विहिरीत डिझेल उतरल्याने त्याचा तपास करत असताना अत्याधुनिक मशिनद्वारे ही चोरी उघडकीस आली. मात्र, ही चोरी कोणी केली हे हे समजले नसून, कंपनीच्या अधिकार्यांतर्फे अज्ञात व्यक्तीविरोधात मनमाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार करे यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाडला भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांचे प्लांट आहेत. या प्लांटमध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसीन यांचा साठा करून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना येथून इंधनपुरवठा केला जातो. मनमाडच्या भारत पेट्रोलियम याठिकाणी थेट मुंबई ते मनमाड पाइपलाइन टाकण्यात आली असून, त्याद्वारे पेट्रोल, डिझेल व केरोसीनचा इंधनपुरवठा केला जातो. याआधीदेखील या पेट्रोल पाइपलाइनमधून चोरी करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. मात्र, यंदाही चोरी अगदी गुप्त पद्धतीने कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने करण्यात आली. मनमाड ते मुंबईदरम्यान असलेली पाइपलाइन शेतकर्यांच्या शेतामधून आलेली आहे.
अनकवाडे शिवारात संपत चव्हाण या शेतकर्याच्या विहिरीत डिझेल, पेट्रोल उतरल्याची माहिती कंपनीला मिळाली. कंपनीने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, याचा तपास लागला नाही. यासाठी खास दिल्लीवरून डीसीव्हीजी मशिनद्वारे सर्व्हे करण्यात आला. यात चार ठिकाणी पाइपलाइन लिकेज असल्याची माहिती समोर आली. मात्र, दोन ठिकाणी केवळ पॅकिंग लिकेज असल्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच ठिकाणी काही अंतरावर दीड इंची छिद्र करून टॅप मारून थेट पाइपलाइनद्वारे नळ कनेक्शन करतो त्याप्रमाणे 48
फुटांपर्यंत नळकनेक्शन करण्यात आले व यातून रोज हजारो लिटर पेट्रोल-डिझेल चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली. याबाबत कंपनीतर्फे अनुज नितीन धर्मराव (प्रबंधक, आरओयू मुंबई-मनमाड- बिजवासन पाइपलाइन नाशिक, रा. बीपीसीएल इन्स्टॉलेशन पानेवाडी, ता. नांदगाव) यांनी रीतसर फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. योबाबत मंडळ अधिकारी मनमाड व तलाठी प्रतिभा नागलवाड यांनी पचनामा केलो. अज्ञात व्यक्तीविरोधात पेट्रोलियम आणि खनिज पाइपलाइन अधिनियम 1962 (जमीन उपयोगाचा अधिकार) आणि यात सन 2011 मध्ये केलेले संशोधन अधिनियम कलम 15, 16 व भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.