जिल्ह्याला अवकाळीने झोडपले

नाशिक : प्रतिनिधी
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी (दि. 6) जिल्ह्याला झोडपलेे. ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, टोमॅटो, ऊस, भाजीपाला, द्राक्षबागा, आंबा, सीताफळ, डाळिंब या फळबागांचेदेखील नुकसान झाले आहे. पावसासह वादळ व गारपीट जिल्ह्याच्या काही भागांत झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत. नांदगाव, बागलाण, पेठ व निफाड तालुक्यांत काही भागांत वादळी वार्‍यासह हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सुरगाणा तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील चिंचले येथे वादळी वार्‍याने घरांचे नुकसान झाले आहे. वाघदोंड येथे अंगणवाडी केंद्राचे वादळी वार्‍यामुळे पडझड झाली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील आंब्याचे व घरांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी वार्‍यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कळवण तालुक्यातील नांदुरी व सप्तशृंगगड येथे वादळी वार्‍यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मालेगाव तालुक्यातही वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस व वादळामुळे ग्रामीण भागात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. अनेक ठिकाणी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरातही सायंकाळनंतर वादळी वार्‍याचा परिणाम जाणवला. त्यानंतर वातावरणात बदल होऊन गारवा पसरला होता. हलक्या स्वरूपाचा पाऊसही काही भागांत झाला.
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे व सातारा या जिल्ह्यांना मुंबई वेधशाळेने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *