चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरी
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, चौंडीमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळासाठी 681 कोटींच्या आराखड्यास मान्यता दिली. तसेच अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, तर मुलींसाठी विशेष आयटीआय सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरीदेखील देण्यात आली आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अहिल्यादेवी होळकर याचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार असल्याचा निर्णय मंत्रिमडळ बैठकीत झाला. यासोबतच तुळजाभवानी मंदिरासाठी 1865 कोटी, ज्योतिबा मंदिरासाठी 259 कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी 1445 कोटी, अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटी, विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी 829 कोटी रुपये, असे एकूण 5 हजार 520 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आलीे.
दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआयची देखील घोषणा करणत आली.
राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार आहे. अहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा यासाठी यशवंत योजना सुरू केली आहे. यातून 10 हजार विद्यार्थी शिकवणार आहेत.
सोबतच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना सुरू करत आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या विहिरींसाठी जलसंधारण विभागाने हाती काम घेतले आहे. ज्यामध्ये 19 विहिरी, 6 कुंड, 34 जलाशयाच्या संवर्धनाचे काम करणार आहोत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला मेळावा होतो. त्यात कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरी दिली आहे. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीनिमित्ताने डाक तिकिटासह प्रेरणा गीतदेखील जारी केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार.
2) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार.
3) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव. यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबविणार.
4) धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव.
5) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार. * राज्यात असे तीन ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी). * राज्यात अशा 19 विहिरी. * राज्यात असे एकूण सहा घाट. * राज्यात असे एकूण सहा कुंड. अशा एकूण 34 जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभीकरण इत्यादी कामे करणार. यासाठी 75 कोटी रुपये खर्च करणार.
6) अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार.
7) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून 5503.69 कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे.
8) ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढविण्याचा निर्णय.