मालेगाव : प्रतिनिधी
शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी व सोसाट्याच्या वार्यामुळे तालुक्यातील पाच गावांतील 145 शेतकर्यांचे 75 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतीपिकांचे कृषी विभागामार्फत पंचनामे केले जात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून तालुका परिसरात ढगाळ वातावण होते. गत सप्ताहात 43 अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान काहीसे कमी झाले होते. याचदरम्यान परिसरात अचानक ढगाळ व पावसाळी वातावरणाची निर्मिती झाली. त्यातच मंगळवारी (दि.6) दुपारी वादळी व सोसाट्याचा वारा आला. या वादळी वार्यामुळे तालुक्यातील कळवाडी, नरडाणे, उंबरदे, दापुरे व पिंपळगाव या पाच गावांतील 145 शेतकर्यांचे 75 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. नरडाणेत सर्वाधिक 98 शेतकर्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात शेवगा, कांदा, लिंबू व केळी बागेचा समावेश आहे. या नुकसानग्रस्त शेतीपिकांची कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी डाळिंबबागांवरील साडी व कपड्यांची आच्छादने उडाली आहेत. त्याचप्रमाणे फळबागा, नेटशेडचे नुकसान झाले. ग्रामीण भागासह शहरात वृक्ष उन्मळून पडले. त्यातच वीजतारा तुटल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरातील खलील हायस्कूलची कुंपण भिंत कोसळल्याने म्हैस दगावली. त्याचप्रमाणे भिंतीजवळ उभ्या असलेल्या चारचाकी, रिक्षा व अन्य वाहनांचे मोठ्या प्रमारणात नुकसान झाले आहे. बुधवारी (दि.7) दुपारी शहरात पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर असणार्या नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसाने उकाडा कमी झाला.