भारतीय कांदा उत्पादक पाकिस्तानवर करणार सर्जिकल स्ट्राइक

निर्यातवाढीमुळे पंधरा दिवसांत भाव वाढणार

समीर पठार ः लासलगाव
पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्बंध लावले आहेत. आता त्यात भारतीय कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या अनोख्या सर्जिकल स्ट्राइकची भर पडणार असून, या मे महिन्यात भारतीय कांदा आशियाच्या बाजारात निर्यातीचा धमाका करण्याच्या तयारीत आहे. परिणामी, दोन आठवड्यांनंतर स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.
कांदा निर्यातीतून संपूर्ण जगाची उलाढाल ही साधारणत: 9 अब्ज डॉलरची आहे. दुसर्‍या क्रमांकावर नेदरलँड 1.10 अब्ज डॉलर, तिसर्‍या क्रमांकावर स्पेन 775 दशलक्ष डॉलर, चौथ्या क्रमांकावर भारत 750 दशलक्ष डॉलर, त्यात चीनचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. जवळपास 3 अब्ज डॉलरची कांदा निर्यात एकटा चीन करतो. तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर जागतिक कांदा निर्यातीत पाकिस्तानचा वाटा आहे. केवळ सरासरी 70 दशलक्ष डॉलर म्हणजेच भारताच्या निर्यातीच्या केवळ 8 ते 9 टक्के. पाकिस्तान प्रामुख्याने पुढील देशांना कांदा निर्यात करतो. 26 टक्के निर्यात मलेशियाला, 14.5 टक्के निर्यात युएईला, 14 टक्के कांदा निर्यात श्रीलंकेत, 11 टक्के कांदा निर्यात ओमान, कुवेत आणि कतार या देशांना, 5.6 टक्के कांदा निर्यात सौदी अरेबियाला, 3 टक्के निर्यात सिंगापूरला, त्यानंतर बहारिन, ब्रुनेई, व्हिएतनाम या देशांना सर्व मिळून केवळ 1 टक्का, तर बांगलादेशला मात्र केवळ एक टक्क्यापेक्षाही कमी कांदा निर्यात करतो.
मागील वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांदा बाजारभाव आटोक्यात राहावे यासाठी भारताच्या केंद्र सरकारने निर्यातबंदीसह निर्यातीवर निर्बंध लावले होते. त्यामुळे आपल्याकडून कांदा निर्यातीवर मर्यादा आल्या.त्यामुळे जागतिक बाजारात जी पोकळी निर्माण झाली, तिचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि तब्बल 2 लाख 20 हजार मे. टन कांदा निर्यात केला. त्यामुळे त्या देशात स्थानिक बाजारात कांद्याचे दर 350 रुपये किलोवर पोहोचले, मात्र निर्यातीतून त्यांनी परकीय गंगाजळी वाढवून घेतली.
यंदा पाकिस्तानमध्ये कांदा लागवड जास्त असून, एप्रिलमध्ये त्यांचा कांदा हंगाम संपला आहे. याशिवाय, अलीकडेच श्रीलंकेला निर्यात केलेल्या कांद्याच्या कंटेनरमध्ये मादक द्रव्याची तस्करी झाल्याचे आढळून आल्याने त्या देशात पाकिस्तानची प्रतिमा खराब झाली आहे. परिणामी, आता श्रीलंकेतून भारतीय कांद्याला मागणी वाढू शकते. पहलगाम प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यानंतरही पाकिस्तानची प्रतिमा जागतिक बाजारात खराब होऊन निर्यातीवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. परिणामी, या मे महिन्यामध्ये भारतीय कांद्याला निर्यातीत मोकळीक मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *