सिडको : विशेष प्रतिनिधी
गंगापूर रोड परिसरात पुन्हा एकदा महिलांच्या गळ्यातील दागिने ओढण्याची घटना घडली असून, यावेळी दोन अज्ञात मोटारसायकलस्वार चोरट्यांनी एका महिलेला लक्ष्य करत दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र लंपास केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहिणी पद्माकर पाटील (वय 58, रा. ओम साई प्लॉट नं. 35, तारवालानगर, नाशिक) या त्यांच्या नात सानवी पवार हिच्यासह बजाज ईव्ही (एम.एच.15 के.ए.0844) गाडीवरून गंगापूर रोडने दिडोरी रोडकडे जात असताना ही घटना घडली.फिर्यादी पाटील केबीटी सर्कल सोडल्यानंतर स्लिपवेल गॅलरी परिसरात पोहचल्या. तेव्हाच मागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओढून घेतले आणि विद्या विकास सर्कलकडे पलायन केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मपोनि नंदा जाधव करीत आहेत.