पाऊस, वादळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार

निफाड ः प्रतिनिधी
तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे सुमारे 374 शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास 144 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा, उन्हाळी मका व भाजीपाला पिकांचा समावेश आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच दोन दिवसांपूर्वी निफाड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला.वादळाचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी जनावरे दगावली.
दरम्यान, बुधवारी (दि. 7) देखील दुपारनंतर वादळाला सुरुवात झाली होती. मंगळवारी (दि. 6) वादळ व पावसामुळे तालुक्यातील 144 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. एकूण 374 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यात 82 हेक्टर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. 36 हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी मका पिकाला फटका बसला आहे.
याबरोबरच 25 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत, असे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी म्हटले आहे. याबरोबरच पाचोरे बुद्रुक येथे वीज पडून म्हैस मृत्युमुखी पडली आहे.
दिंडोरी, नांदूर मध्यमेश्वर येथे बेदाणा उत्पादक व्यापार्‍यांचे शेड जमीनदोस्त झाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. नांदगाव, येवला, मालेगाव, परिसरातून मेंढपाळ मोठ्या संख्येने गोदाकाठ परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, पावसामुळे संपूर्ण शिवार ओलेचिंब होऊन शेतात पाणी साचल्याने या कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली. मुक्या प्राण्यांचेदेखील हाल झाले. अनेक ठिकाणी चाळीवरील पत्रे उडाले असून, चाळी दुरुस्तीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत.

माझे पंधरा ट्रॅक्टर कांदा काढून पडला आहे. अचानक पाऊस आल्याने प्लास्टिक कागद टाकला. मात्र, खालून पाणी गेल्याने सुमारे दोन ट्रॅक्टर कांदा सडून नुकसान झाले आहे. आमच्याकडे गारादेखील पडल्याने त्याचा फटका भाजीपाला पिकालासुद्धा बसला आहे.
– हर्षल सांगळे, शेतकरी, शिवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *