निफाडला जलजीवन मिशनच्या 90 योजना पूर्ण

उर्वरित पाच योजना तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण; लवकरच पूर्णत्वाकडे

निफाड : प्रतिनिधी
निफाड तालुक्यात जलजीवन मिशनच्या मंजूर 95 कामांपैकी जवळजवळ 90 योजना सुरू झालेल्या असून, ज्या 5 गावांमध्ये या योजना अपूर्ण आहेत, तेथे स्थानिक तांत्रिक अडचणी असल्याने त्यादेखील सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संदीप शिंदे यांनी सांगितले.
जलजीवन मिशन ही योजना संपूर्ण जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती. निफाड तालुक्यात एकूण 95 कामे मंजूर झाली होती. त्यापैकी 90 योजनांचे काम पूर्ण झाले असून, या योजनेद्वारे 90 गावांत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पूर्वी नळजोडणीद्वारे प्रतिदिन प्रतिमाणसी एका दिवसासाठी 40 लिटर शाश्वत पाणीपुरवठा करावा लागत असे. काळानुरूप पाणी वापर वाढल्याने सन 2020-21 मध्ये राज्य शासनाने जलजीवन मिशन योजना सुरू केली होती. परिणामी, या योजनेत प्रतिदिन, प्रतिमाणसी 55 लिटर शाश्वत शुद्ध पाणी पुरवण्यात येत आहे. निफाड तालुक्यात 95 कामे मंजूर झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जागेची उपलब्धता आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य यामुळे 90 गावांमध्ये या योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. तर यातील 56 पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित पाच गावांमध्ये ही योजना अपूर्ण आहे. त्यातील काही गावपातळीवर, तांत्रिक अडचणीमुळे योजना अपूर्ण असून, यातील त्रुटी दूर झाल्यानंतर या योजनादेखील लवकरच सुरू होणार आहे.
यातील कानळद गावाला या योजनेसाठी ग्रामपंचायतीची साठवण बंधार्‍याची जी जागा देण्यात येणार आहे, त्या जागेची मोजणी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत प्रलंबित असून, सदर मोजणी पूर्ण होऊन जागेचे सीमांकन झाल्यानंतर योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. तर उगाव ग्रामपंचायतीचीदेखील योजना मंजूर झाली आहे. परंतु पाण्याचा जो जलस्रोत आहे तो कोरडा निघाल्याने या ग्रामपंचायतीने दुसरी जागा शोधण्याचा प्रयत्न केला असून, उगावपासून 4 किलोमीटरवर असलेल्या निफाड येथे कादवा नदीतीरावर पाण्याच्या जलस्रोतासाठी जागा उपलब्ध झाली असून, या योजनेसाठीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
तालुक्यातील तामसवाडी येथील जलस्रोताचे पाणी क्षारयुक्त लागल्याने ते पिण्यायोग्य नसल्याने या गावातील पाण्याचा जलस्रोत बदलून दुसरीकडे घेण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून, या योजनेचे काम 80 टक्के प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील रेडगाव येथे मूळ जलस्रोताला पाणी कमी असल्याने पुन्हा नवीन जलस्रोतासाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तो मंजूर झालेला आहे. त्यानुसार नवीन जलस्रोत घेतला असून, येथील काम 60 टक्के प्रगतीपथावर आहे तर सोनेवाडी (खुर्द) येथेदेखील या योजनेचे काम प्रगतीत होते, मात्र असे असले तरी येथे विहिरीच्या जागेचा वाद असल्याने येथील काम बंद आहे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येऊन आणि लवकरच हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

तालुक्यात मंजूर झालेल्या योजना पूर्ण झाल्या, तर काही पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. अधिकारी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सहकार्य केल्याने वेळप्रसंगी आम्हीदेखील रात्रीचा दिवस करीत प्रत्यक्ष घटनास्थळी जात अडचणी सोडवण्याला प्राधान्य दिले. खडकमाळेगाव, नांदूरमध्यमेश्वर, नांदुर्डी अशा मोठ्या ग्रामपंचायतींची कामे वेळेत पूर्ण झाल्याचे समाधान वाटते.
संदीप शिंदे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *