गुन्हे शाखा युनिट-2 ची उल्लेखनीय कामगिरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांपासून विनयभंगाच्या गुन्ह्यात फरारी असलेला आणि दोन वर्षांकरिता नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आरोपी गणेश तुळशीराम लिपणे (वय 23) यास गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली.
दोन वर्षांकरिता नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आरोपी गणेश तुळशीराम लिपणे हा पाथर्डी फाटा परिसरात फिरत असल्याची युनिट क्रमांक 2 च्या पोलिस पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक परिसरात सापळा रचून अरोपी गणेश लिपणे याला अटक केले गणेश लिपणे हा आरोपी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फरारी होता. त्याच्यावर नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपाराची कारवाई झाली होती. तरीही त्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात वावर केल्याने त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीत सपोनि हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), पोउनि मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, संजय सानप, परमेश्वर दराडे, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, मनोहर शिंदे व इतरांचा सक्रिय सहभाग होता. आरोपीला पुढील चौकशीसाठी सातपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.