1.77 लाखांचा मुद्देमाल जप्त
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील अमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा कठोर अंमल सुरू असून, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सतर्क आणि धडाकेबाज कारवाईत मॅफेड्रॉन (एम.डी.) विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण 1 लाख 77 हजार 230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वपोनि सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, साहिल उर्फ विवेक अनिल गांगुर्डे (वय 24, रा. एन-43, पवननगर, सिडको) व अमित उर्फ अभि नितीन पाटील (वय 20, रा. अक्षय चौक, पवननगर, सिडको) हे दोघे एम.डी. विक्रीसाठी अंबड लिंक रोडवरील हनुमान मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 45 हजार रुपये किमतीचे 9.5 ग्रॅम मॅफेड्रॉन तसेच 1 लाख 32 हजार 230 रुपये किमतीचे मोबाइल व रोख रक्कम असा एकूण 11 लाख 77 हजार 230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे व अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या समन्वयातून पार पडली.