भेंडी येथे सरकारी मालमत्तेचे नुकसान; संबंधितांवर कारवाईची मागणी
कळवण ः प्रतिनिधी
तालुक्यातील भेंडी शिवारात सुमारे 50 वर्षांपूर्वीचा सरकारी नालाबल्डिंग असलेला बंधारा परिसरातील शेतकर्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे. याबाबत संबंधित विभागाकडे शेतकर्यांबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याने उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी तक्रार तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात तक्रारदाराने म्हटले आहे की, नरेंद्र माधवराव चव्हाण, महादू दोधू चव्हाण (रा. बगडू) यांच्या मालकीच्या गट नंबर 79 ही शेतजमीन भेंडी ( ता. कळवण ) शिवारात आहे. पश्चिम बाजूस उत्तम यशवंत रौंदळ यांची गट नंबर 73 ही शेतजमीन आहे.
या जमिनीमधून पूर्वपार नाला असून, सदर नाल्याने पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या पाणी वाहते. परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाने दखल घेत चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी गट नंबर 79 व गैरअर्जदारांंची शेतजमीन गट नंबर 73 यातून असलेल्या सरकारी नाल्यात नालाबल्डिंगचे बांधकाम सुमारे 50 वर्षांपूर्वी केले होते. यामुळे पावसाळ्यातील पूरपाणी अडविले जात होते.
हे साठलेले पाणी जमिनीत मुरत असल्याने परिसरातील विहिरींना तसेच शेतकर्यांना त्या पाण्याचा फायदा होतो. त्यामुळे परिसरात पाणीटंचाई जाणवत नव्हती. मात्र, गैरअर्जदार उत्तम यशवंत रौंदळ व कुटुंबीयांनी नाल्यात असलेले नालाबल्डिंग बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे.
या कृत्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकर्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. नालाबल्डिंगचे बांधकाम व सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. याबाबत माहिती संबंधित भेंडी गावाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना देऊनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.
याबाबत संबंधित गैरअर्जदार शेतकर्याची कसून चौकशी करून सरकारी मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे निवेदन तक्रारदार शेतकरी नरेंद्र चव्हाण व महादू चव्हाण यांनी तहसीलदार वारुळे, गटविकास अधिकारी, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग, सरपंच भेंडी यांच्याकडेे निवेदनाद्वारे केली आहे.