उघड्यावर ठेवलेले द्राक्ष, बेदाणा भिजल्याने नुकसान
दिक्षी : वार्ताहर
यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादकांना प्रतिकिलो 50 ते 80 रुपये दर मिळाल्याने बेदाणा उत्पादकांसाठी द्राक्षांना 25 ते 30 रुपयांचा भाव देऊनही कच्चा माल मिळत नसल्याने बेदाणा उत्पादक हवालदिल झाला होता. या परिस्थितीत बेदाणा उत्पादकांनी द्राक्षमणी खरेदी केली. मात्र, मालाला सुकवण्यासाठी बनवण्यात आलेल्या शेडला व वाळण्यासाठी उघड्यावर टाकलेल्या बेदाण्याला गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. बेदाण्याचे मोठे नुकसान झाल्याने बेदाणा उत्पादक अडचणीत आला आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष बेदाण्यांचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे केवळ बेदाण्याचेच नाही, तर इतर पिकांचेदेखील मोठे नुकसान झाले.
अवकाळी पावसाने बेदाणा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. उघड्यावर ठेवलेले द्राक्षे आणि बेदाणा भिजल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तरी शासनाने त्वरित पंचनामे करून बेदाणा उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी.
-राजू पठाण, बेदाणा उत्पादक, दिक्षी